राज्यात आजपासून चार दिवस पावसाची शक्यता

पुणे : उत्तर भारताकडून थंड वारे अन् दक्षिणेतून येणारे बाष्पयुक्त वारे यांची टक्कर राज्यावर होत आहे. त्यामुळे वरच्या थरांत झोतवारा (जेट स्ट्रीम विंड) वेगाने वाहत आहे. हे वारे वातावरणाच्या खालच्या थरांतही येत असल्याने राज्यात बोचरे वारे, दाट धुके अन् पावसाचे वातावरण तयार झाले असून बुधवारपासून चार दिवस काही भागांत हलक्या सरींचा अंदाज आहे.

तीन ते चार दिवसांपासून राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमानाचा सरासरी पारा 9 ते 10 वरून 18 ते 22 अंशांवर गेला. तरीही गारठा जाणवत आहे. याचे कारण झोतवार्‍याचा वाढलेला प्रभाव हे आहे. उत्तर भारत गारठला असून जम्मू-काश्मीर ते मध्य प्रदेशपर्यंतची राज्ये गारठली आहेत.

महाराष्ट्रात मात्र उत्तर व दक्षिण भागातून येणार्‍या वार्‍यांची टक्कर होत असल्याने विचित्र वातावरण तयार झाले आहे. तापमानात वाढ होऊनही वरच्या थरातील वारे, दाट धुके अन् पाऊस असे वातावरण 25 ते 29 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सध्या धुळे, नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात इतर भागातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.

धुके अन् बोचरे वारे कशामुळे ?

सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीसमोर दक्षिणोत्तर उभ्या लंबवर्तुळाकार समुद्री क्षेत्रात समुद्रसपाटीपासून दीड कि.मी. उंचीपर्यंत अरबी समुद्रात असलेल्या आवर्ती चक्रिय वार्‍याच्या स्थितीतून वाहणार्‍या वार्‍यामुळे संपूर्ण कोकण, खान्देश व नाशिक, अहिल्यानगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना या 19 जिल्ह्यात अरबी समुद्रावरून प्रचंड आर्द्रता वाढली आहे. राज्यात बोचरे वारे अन् दाट धुके जाणवत आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी दिली.

या पिकांवर होऊ शकतो परिणाम..

हवामान तज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी सांगितले की, कांदा, गहू, हरबरा पिकावर अळी, कीड, बुरशी, माव्याचे आक्रमण होऊ शकते. त्यामुळे कीड व बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्या लागण्याचीही शक्यता आहे. फुलोर्‍यातील पिकांच्या परागीभवन व घाटे अवस्थेतील दाणाभरणीवर विपरित परिणाम होऊ शकतो. प्रकाशसंष्लेषणा अभावी अन्नद्रव्याच्या अपुर्‍या पुरवठ्यातून पिके कोमेजणे, वाढ खुटणे असे परिणाम होऊ शकतात. घड तयार होत असणार्‍या द्राक्षांच्या बागांवरही दमट हवामानाचा विपरित परिणामही होऊ शकतो.

झोतवारा म्हणजे काय ?

राज्यात उत्तर भारतातून शीतलहरी येत आहेत तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारेही येत आहेत. या दोन्ही वार्‍याची टक्कर होत आहे. त्यामुळे हवेच्या वरच्या थरात झोतवारा (जेट स्ट्रीम विंड) तयार होत आहे. समुद्रसपाटीपासून 20 ते 50 हजार कि.मी. अंतरावर ही प्रक्रिया होत आहे. त्याचा परिणाम हवेच्या खालच्या थरांत जाणवत आहे. बोचरे वार सतत वाहत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊनही थंडी जाणवत आहे. तसेच पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 25-12-2024