देवरूख : संगमेश्वर तालुक्यात तहसीलदार कार्यालयांतर्गत सुशासन सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
या कालावधीत तहसीलदार कार्यालयामार्फत तसेच मंडळ अधिकारी कार्यालयामार्फत देवरुख, हातीव, ताम्हाने, तेये, मुचरी, माखजन, धामापूर तर्फे संगमेश्वर, आरवली, तुरळ, फणसवणे, कळंबस्ते, लोवले, माभळे, आंगवली, बामणोली, देवळे, दाभोळे, गावामध्ये महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
तहसीलदार अमृता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख महसूल मंडळामार्फत मंगळवारी क्यूआर कोड वाचनालय अनावरण करण्यात आले. क्यूआर कोडच्या माध्यमातून विविध पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली. या माध्यमातून महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजामधील माहितीची रचना व कार्य, ऑनलाईन सातबारा, तलाठी कामकाज मार्गदर्शिका, गोष्टीतून फेरफार शिकूया, जनमाहीती अधिकारी, महसूल न्यायालय, जाणून घ्या महसूल संलग्न कायदे, वारस नोंदी, महसूल प्रश्नोत्तरे, १०१ महसूल लेख अशी बहुमूल्य मार्गदर्शक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली.
या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी मंडळ अधिकारी रोहीत पाठक व त्यांचे सहकारी ग्राम महसूल अधिकारी रोहित वाकचौरे, दिगंबर चौधर, जयश्री पाटील, द्वारकेश तायडे यांनी मार्गदर्शन केले.
विविध १३८ दाखल्यांचे वितरण
या सप्ताहात विविध १३८ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. खातेदारांना त्यांचे ९१ सातबारा ७ आठ अ, ८४ फेरफारचे वितरण करण्यात आले. विविध योजनांचे १७ अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच कोंडगाव, साखरपा, कडवई, चिखली, कोंडकदमराव, तुळसणी, डिंगणी व फुणगूस या गावामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 25/Dec/2024














