चिपळूण : चिपळूण तालुक्यात गेल्या महिन्यापासून ग्रामीण भागातील वस्तीच्या ठिकाणी बिबट्याचा शिरकाव होत असून, रात्रीचा संचारदेखील वाढला आहे. परिणामी, बिबट्याचा हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांचा नाहक बळी जात असल्याचे दिसून येत आहे.
सप्टेंबर दरम्यान तालुक्यातील तळसार, पोफळी, कुंभार्ली, कोळकेवाडी, नागावे, तिवरे, मार्गताम्हाणे, कुडप, कोसंबी, असुर्डे आदी भागात बिबट्याचा वावर दिसून आला होता. नुकतेच तळसर आणि शिरगावच्या हद्दीत केलेल्या हल्ल्यात तीन जनावरांना आपला जीव गमवावा लागला. हा हल्ला घरांची मोठी वस्ती असलेल्या परिसरातच झाला असल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये त्या दरस्यान दहशतीचे वातावरण पसरले होते. हे प्रकरण शांत होते ना होते तोच सध्या अलोरे, पोफळी या ठिकाणी आता बिबट्याने आपला मोर्चा वळवल्याचे पाहावयास मिळते आहे. या भागातील कुत्र्यांना बिबट्याने टार्गेट केले आहे. काही दिवसांपूर्वी कळंबस्ते येथून घराच्या अंगणातून बिबट्याने कुत्र्याची पिल्ले उचलून नेली होती. त्याच पद्धतीने नागावे येथील रमेश जाधव यांच्या घरासमोरून बिबट्याने कुत्रा पळवली. या घटनेनंतर नागवे, अलोरे परिसरात नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. पोफळी, पवारवाडी येथील डोंगराळ भागात धनगर समाजातील लोक झोपड्या बांधून राहतात. त्यांच्या गुरांवर आठ दिवसांपूर्वी हल्ला केला होता. पोफळी आयनाचे तळे येथे सायंकाळी बिबट्या शिवारात वावरताना दिसतो.
वनविभागातर्फे जनजागृती सुरूच असून सद्यःपरिस्थितीत वनविभागामार्फत गावोगावी बिबट्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्यापासून सुरक्षितता बाळगण्यासाठी विविध उपाययोजनादेखील करण्यात येत आहेत. – सरवर खान, परिक्षेत्र वनाधिकारी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 25/Dec/2024














