अटलबिहारी वाजपेयींची भेट आयुष्यातील ठेव : अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : पंतप्रधान होण्यापूर्वी सहा महिने आधी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवेळी पणजीतील मांडवी हॉटेलच्या बाल्कनीत मुलाखतीच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयी यांची भेट झाली. ही भेट माझ्या आयुष्यातील ठेव आहे. मुलाखतीला कोठे बसायचे, हा प्रश्न त्यांनीच हॉटेलच्या बाल्कनीची निवड करून सोडवला. एवढा प्रचंड उंचीचा नेता; परंतु बाल्कनीतील बाकावर बसून त्यांनी मुलाखत दिली. मोठी माणसं खरच मोठी असतात, अशा शब्दांत अॅड. विलास पाटणे यांनी भारतरत्न, दिवंगत पंतप्रधान, भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण सांगितली.

अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मशताब्दी आजपासून (ता. २५) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. पाटणे यांनी सांगितले की, चिपळूणला मी कॉलेजला शिकत असताना सभेच्या दुसऱ्या दिवशी अटलजींची प्रेमजीभाई आसरांकडे भेट झाली होती. रत्नागिरीच्या त्यांच्या सभेच्या स्वागतानंतर विश्रामगृहावर झालेल्या भेटीच्या आठवणी आजही माझ्या डोळ्यासमोर तरळत आहेत.

जनाधाराचं निर्मळ समर्थन वाजपेयाच्या प्रामाणिक विचारात, समर्पित आयुष्यात आणि शुद्ध चारित्र्यात होतं. अटलजींनी शेवटच्या श्वासापर्यंत तत्त्वाची बांधिलकी मानली. शब्दांचे सौंदर्य, भाषेचा गोडवा आणि गीताची गेयता ही त्यांच्या कवितेची ठळक वैशिष्ट्ये. त्यांनी कवितेमधून सत्याचा आणि सत्त्वाचा शोध घेतला.

शुद्ध चारित्र्य, समर्पित आयुष्य आणि वक्ता दशसहस्रदेशू होते, अशा शब्दांत अॅड. पाटणे यांनी अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतीला अभिवादन केले.

समर्पित कार्यकर्ता
१९५३ मध्ये जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी मुंबईत आले. सायंकाळी विलेपार्लेच्या सभेत दोन्ही कुर्ते फाटलेले असल्याने जॅकेट घालून भाषण दिले आणि पहिल्याच भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. भाषण झाल्यावर अटलजी दिल्लीला रवाना झाले. दोन दिवसांनी पं. दीनदयाळजींची तार बक्षींना मिळाली. तुम्ही प्रवासखर्चाला दिलेले १० रु. ही त्यांनी माझ्याकडे परत केले. बक्षींच्या लक्षात आले की, परतीच्या प्रवासातही त्यांनी काही खाल्ले नाही. सर्वस्वाचा त्याग करून हा समर्पित कार्यकर्ता १५ मे १९९६ ला देशाचा पंतप्रधान झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 25/Dec/2024