छतावर सौरऊर्जा निर्मितीसाठी ‘महावितरण’तर्फे मोफत नेट मीटर

रत्नागिरी : छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेटमीटर दिले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली व घरामध्ये किती विजेचा वापर झाला, याची अद्ययावत माहिती मोबाईल अॅपवर मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ग्राहकांना ही सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीजयोजना सुरू केली. त्या अंतर्गत ३ किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ग्राहकाच्या छतावर बसवलेल्या सौरऊर्जा प्रकल्पात किती वीज तयार झाली. ग्राहकाने घरात किती वीज वापरली व किती अतिरिक्त वीज ग्राहकाकडून महावितरणला विकली गेली याची नोंद करण्यासाठी एक वेगळा नेट मीटर बसवावा लागतो. आतापर्यंत त्याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता. आता महावितरणने ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांचे पैसे वाचण्यासोबत त्यांना मोबाईल फोनवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिट इत्यादी माहिती दररोज मिळेल. त्यानुसार त्यांना वीजवापराचे नियोजन करून वीजबिल शून्य येण्यासाठी नियोजन करता येईल.

राज्यात सध्या ३ लाख २३ हजार ग्राहकांनी महावितरणकडे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. या सर्व ग्राहकांना महावितरणच्या सोलर नेट मीटर विनामूल्य देण्याच्या निर्णयाचा लाभ होईल. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी www. pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 25/Dec/2024