साडवली : शेतकरी जगला तरच आम्ही जगू, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोल आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. एक झाड विनापरवाना तोडले तर ५० हजाराचा दंड, असा कायदा आल्यानंतर शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली होती. यावर मंत्रालयातील अधिकारी वर्गाशी आपण चर्चा केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सहकार्याने सदर विधेयकाला तात्पुरती स्थगिती आणण्यात यश आले. पुढील काळात देखील हा कायदा शेतकऱ्यांसाठी जाचक ठरणार नाही, या दृष्टीने आमचे नेहमी प्रयत्न असणार आहेत, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देवरुख येथे केले.
शेतकरी लाकूड व्यापारी संघटना तालुका संगमेश्वरच्यावतीने देवरुख माटे-भोजने सभागृह येथे आमदार उदय सामंत, शेखर निकम व किरण सामंत यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक किरण जाधव यांनी केले. त्यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले, जागतिक तापमानात खूप बदल झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपला व्यवसाय सांभाळून नवनवीन उपक्रम राबवून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. रोजगार व ऑक्सिजन देणारी झाडे कोणती याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे जे आपले काम करताहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून साथ द्या.
‘विनापरवाना वृक्षतोडीस ५० हजार रु. दंड’ या कायद्याला तात्पुरती स्थगिती आणली आहे; मात्र तरी देखील शेतकरी वगनि सरसकट झाडे तोडू नयेत. ‘एक झाड तोडले तर दोन झाडे लावणे’ ही संकल्पना सर्वांनी जपली पाहिजे. बांबू, लागवड, खैर लागवडीतून रोजगार निर्मिती करता येऊ शकते. तसेच जुन्या झाडांचेही संवर्धन करावे, सामाजिक बांधिलकी जपून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करू या, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 26/Dec/2024














