रत्नागिरी : राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे २१ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत रत्नागिरीच्या दामले विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. आता दामले विद्यालय हे ५ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान ग्वाल्हेर (मध्यप्रदेश ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.
महाराष्ट्राच्या आठ प्रशासकीय विभागातून प्रथम आलेल्या भूमिका अभिनय (रोल प्ले ) संघांचे काल विद्या परिषद, पुणे येथे सादरीकरण झाले. यामध्ये दामले विद्यालयाने कोल्हापूर विभागाचे नेतृत्व केले. या स्पर्धेत दामले विद्यालयाचे शिक्षक योगेश कदम यांनी लिहिलेल्या वैयक्तिक सुरक्षा या स्किटमध्ये स्वरा चौगुले, मनस्वी तोडणकर, रिया मांडवकर, श्रेया देसुरकर आणि यश बागकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर दिग्दर्शन शाहबाज गोलंदाज यांनी केले होते. यात लहान मुलांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक सुरक्षेबाबत विचार मांडण्यात आले होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत दामले विद्यालयाच्या संघाने परीक्षकांची वाहवा मिळवली. यावर्षी प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याने दामले विद्यालयाच्या रूपाने कोल्हापूर विभागाचे नेतृत्व केले.
या यशाने राष्ट्रीय भूमिका अभिनय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची रत्नागिरी जिल्ह्याला प्रथमच संधी मिळाली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे यांनी याप्रसंगी केले. या स्कीट सादरीकरणासाठी श्री. रवींद्र शिंदे सौ. नेहा उकिडवे, सौ. श्रद्धा गांगण, श्री. विशाल चव्हाण, श्री. अनिल शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
दामले विद्यालयाने मिळवलेल्या यशाबद्दल डायट प्राचार्य श्री. सुशील शिवलकर, कोल्हापूर शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर, डायट ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीम. दीपा सावंत, ज्येष्ठ रंगकर्मी श्री. प्रदीप तेंडुलकर, श्री. अनिल दांडेकर यांनी संघाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 26-12-2024














