दापोली बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य

दापोली : येथील बसस्थानकामध्ये कचऱ्याचे साम्राज्य झाले असून, या ठिकाणी अस्वच्छतेचा प्रचंड बोजवारा झालेला दिसून येत आहे. आगार प्रमुखांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दापोली बसस्थानकावर गेली दोन वर्षे निवेदिता प्रतिष्ठान आणि कोकण प्रवासीप्रेमी संघटनेच्या माध्यमातून दापोली एसटी स्टैंड येथील प्लास्टिक बाटल्या आणि रॅपर्स याचे नियोजन केले होते. यामध्ये दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेने सक्रिय सहभाग घेतला. निवेदिता प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने स्वतःच्या खर्चाने दापोली बसस्थानकावर कचऱ्यासाठी दोन पिंजरे उभे केले आहेत. सातत्याने येथील हजारो बाटल्या आणि रॅपर्सचा कचरा हा पुनर्वापर प्रकल्पाकडे दोन वर्षे पाठवण्यात येत होता. मात्र, सद्यःस्थितीत या सगळ्या स्वच्छता मोहिमेवर बोळा फिरलेला दिसून येत आहे. या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे, असे दिसून येत आहे.

गाडीत पडलेला कचरा आणि पाण्याच्या बाटल्या याचा पुनर्वापर प्रकल्प राबवणारा दापोली आगार पहिला होता. तत्कालीन आगारप्रमुख रेश्मा मधाळे यांच्या अथक परिश्रमातून आणि सहकार्यातून प्रवासी आणि सामाजिक संस्थांच्या मेहनतीने एक वेगळा ठसा उमटवण्यात आला होता; मात्र सद्यः स्थितीतील चित्र हे अतिशय गलिच्छता पसरवणारे दिसत आहे.

दाभोळला शेडचे कामामुळे प्रवाशांची गैरसोय
तालुक्यातील दाभोळ येथे शेडचे काम सुरू असल्यामुळे तिथेही प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी पर्यायी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी आगारातील प्रसाधनगृहही अस्वच्छ असल्याचे चित्र आहे. याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे जे काम गेले दोन वर्षे अथक परिश्रमातून उभे केले होते, त्यालाही पुन्हा एकदा चालना मिळावी, अशी अपेक्षाही प्रवासीवर्गातून उमटत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 26/Dec/2024