चिपळुणात रविवारी हाफ मॅरेथॉनचे आयोजन

चिपळूण : येथील संघर्ष क्रीडा मंडळाच्यावतीने व चिपळूणकरांच्या सहकायनि रविवार दि. २९ डिसेंबर रोजी चिपळूण हाफ मॅरेथॉन, या राष्ट्रीय २१ किलोमीटर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. ‘रन टू एलीमिनेट प्लास्टिक वेस्ट’ असे स्पर्धेचे बोधवाक्य आहे. संघर्ष क्रीडा मंडळातर्फे आयोजित या स्पर्धेतून प्लास्टिक मुक्तीचा संदेश सर्वदूर देण्याचा मानस असल्याने चला धावू या प्लास्टिक मुक्तीसाठी, असे घोषवाक्य तयार करण्यात आल्याचे संघर्ष क्रीडा मंडळाचे भाऊ काटदरे यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत आंध्र प्रदेश, छत्तीसगड, आसाम, दिल्ली, गोवा, हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब, या राज्यातून व महाराष्ट्रातील अहमदनगर, बदलापूर, बुलढाणा, मुंबई, सांगली, कोल्हापूर, लातूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, पोलादपूर, पुणे, सातारा या ठिकाणाहून सातशेच्या वर
स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा २१ किलोमीटर, दहा किलोमीटर व पाच किलोमीटरच्या महिला व पुरुष गटात होणार असून शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रथमच वर्ष असल्याने प्रवेश मोफत देण्यात येणार आहे. या स्पर्धेत १४ ते १७, १८ ते २१, २१ ते ३०, ३१ ते ४०, ४१ ते ५०, ५१ ते ६० व ६० वर्षांवरील असे गट तयार करण्यात आले असून या गटात येणाऱ्या प्रत्येकी पाच स्पर्धकांना रोख बक्षीस व शिल्ड देण्यात येणार आहे. शिवाय स्पर्धा नियोजित वेळेत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना मेडल व सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला मिळून एकूण अडीच ते तीन हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये पुरुष व महिला मिळून ११२ बक्षिसांची रक्कम सात लाख रुपये इतकी आहे. खेळाडूंना मेडल, टी-शर्ट बॅग देण्यात येणार येण्यात येणार असून त्या रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेल्या असतील. या स्पर्धेच्या तयारीसाठी आयर्न मॅन डॉ. तेजानंद गणपत्ये, डॉ. संजय भागवत, मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे खेळाडू व सभासद अथक परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेत चिपळूणच्या नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून प्लास्टिक मुक्त भारत हा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संघर्ष क्रीडा मंडळाच्यावतीने भाऊ काटदरे यांनी केले आहे.

मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी व लांजा तालुक्यातील शाळांमधून सुमारे साडेसातशे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.

डीबीजे महाविद्यालय नियमक समितीचे चेअरमन मंगेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली १६० कार्यकर्ते संपूर्ण स्पर्धेसाठी व्यवस्थापनात मदत करणार आहेत. संघर्ष क्रीडा मंडळाचे सुमारे ७५ कार्यकर्ते या स्पर्धेसाठी मेहनत घेत असून संपूर्ण पवन तलाव, सांस्कृतिक केंद्र मैदान येथे स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे. रविवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे ही स्पर्धा सुरू होऊन बहादूरशेख नाका, कळंबस्ते, वालोपे, परशुराम घाटमार्गे परशुराम स्टॉपपर्यंत जाऊन परत त्याच मार्गे परत येईल, असे श्री. काटदरे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 26/Dec/2024