ठाणे : बदलत्या काळात नव्या पिढीवर आपल्या समृद्ध धार्मिक संस्कृती व विचारांचे संस्कार करण्यात पालक अयशस्वी होत आहेत, अशी खंत व्यक्त करीत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मोबाईलचा गैरवापर, दारू आणि जुगारात शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, याकडे त्यांनी पालकांचे लक्ष वेधले.
पालकांनी वेळीच सतर्क होऊन आपली भविष्यातील पिढी वाचवावी, असे आवाहन श्री. इंदुरीकर यांनी केले.
भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथे सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. या महायज्ञाच्या सातव्या दिवशी श्री. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. या वेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. या वेळी भाजपाचे आमदार संजय केळकर यांचा इंदुरीकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवीन पिढी स्वार्थ व पैसा यामध्ये गुरफटली जात आहे. शाळांमधील ४० टक्के विद्यार्थी ऑनलाईन रमी खेळत आहेत. तर १० टक्के तरुण शेअर बाजाराच्या आहारी गेले आहेत. घरांघरांमधून शुभंकरोती व देवापुढे दिवा लावणे हे बंद झाले. परिणामी नव्या पिढीला संस्काराची ओळख होत नाही, हे दुर्देवी आहे, याकडे कीर्तनकार श्री. इंदुरीकर यांनी लक्ष वेधले.
जगात वारकरी सांप्रदाय हा एकमेव असून, त्यात राव-रंक, वय, उंची किंवा आधारकार्ड-पॅनकार्ड असा फरक केला जात नाही. केवळ विठ्ठल नामस्मरण केल्यावर सर्व सुख मिळते. श्री विठ्ठलाचे स्मरण करतानाच आयुष्यातील वेळ न घालविता रात्रंदिवस कष्ट केल्यास तुम्ही सुखी व्हाल, असा सल्ला श्री. इंदुरीकर यांनी दिला. उपवास करुन देव भेटत नाही. पण वैज्ञानिक दृष्टीने आठवड्यातील एक दिवस उपवास केल्यास पचनशक्तीला आराम मिळेल. आपण करीत असलेले कर्म हीज पूजा असे मानून प्रत्येक व्यक्तीने नीतीने वागावे. चांगले वागून समाजाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन श्री. इंदुरीकर यांनी केले.
सध्या घराबाहेर हॉटेल-धाब्यांवर जेवण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात ६० टक्के नागरिक घरी शिजविलेले अन्न खात नाहीत. आहार चांगला नसल्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक व्यक्तीने काम, क्रोध आणि रोगावर नियंत्रण ठेवून जगावे, असा सल्ला श्री. इंदुरीकर यांनी दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 26-12-2024