चिपळूणमधील झोन पद्धतीत बदल करण्याची मागणी

चिपळूण : शहरातील मालमत्ता कर धारकांच्या वाढीव कर रक्कम विरोधातील हरकती सुनावणीसाठी आलेल्या रत्नागिरी येथील जिल्हा नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांजवळ गुरुवार दि. २६ रोजी शिवसेनेचे शहरप्रमुख (उबाठा) शशिकांत मोदी व माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी भेट घेतली आणि वाढीव घरपट्टीसंदर्भात झालेल्या चुका निदर्शनास आणल्या, शहराची भौगोलिक रचना पूर परिस्थिती, लाल व निळी पूररेषा याचा विचार करून झोन पद्धतीत बदल करावेत, अशी मागणी केली.

यावेळी काही बाबतीत शासनाकडून निर्णय झाल्यास त्या पद्धतीने नियोजन करता येईल, असे स्पष्टीकरण संबंधित महिला अधिकाऱ्यांनी दिले. वाढीव घरपट्टी कराविरोधात नागरिकांकडून हरकती व तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्या बाबत गुरुवारी सांस्कृतिक केंद्र येथे सुरू झालेल्या सुनावणीदरम्यान आलेल्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांजवळ माजी नगरसेवक मोदी व मुकादम यांनी चर्चा केली. चर्चेदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणामध्ये शहरातील पूरप्रश्नाचा उल्लेख करणे गरजेचे होते ही वाव मान्य केली.

यावेळी झालेल्या चर्चेत मोदी व मुकादम यांनी शहराची भौगोलिक रचना लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानातील पोटमाळा हा त्यांच्या साहित्याच्या सुरक्षेसाठी एक आधार असून, त्याची कर आकारणीत नोंद करू नये. त्याचप्रमाणे शहरातील प्रार्थनास्थळ अंतर्गत असलेल्या खोल्या धार्मिक व्यवस्थापनासाठी असल्याने त्याचाही करात समावेश करू नये. शैक्षणिक संस्थांच्या वाढीव कराबाबत सवलतींचा विचार व्हावा. गुरांच्या गोठ्यालादेखील मोठ्या प्रमाणात कर आकारणी करण्यात आली आहे.

शहराची भौगोलिक रचना, पूर परिस्थिती, लाल व निळी पूररेषा या सर्वांचा विचार करून झोन पद्धतीत बदल व्हावेत. गॅलरीचा समावेश घरपट्टी आकारणीत करू नये. कारण अनेक ठिकाणच्या गॅलरीमध्ये वन्यजीव, पशु-पक्षी थेट घरात येतात. त्यामुळे त्यांना तात्पुरत्या जाळ्या बसविलेल्या असतात. त्याचा बंदिस्त गॅलरी म्हणून उल्लेख होऊ नये आदी मुद्दे मोदी व मुकादम यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.

इमारतीवरील शेडचा कर आकारणीत समावेश नाही
यावेळी मुकादम यांनी सांगितले की, इमारतीवरील शेडचा आकारणीमध्ये समावेश आहे. याबाबत लक्ष वेधल्यानंतर संबंधितांनी सांगितले, अशा शेडचा कर आकारणीत समावेश केलेला नसून जर कोणाचा समावेश झाला असेल अशांची यादी तयार करून त्यात दुरूस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 27/Dec/2024