संगमेश्वर बाजारात वाहतूक कोंडी

संगमेश्वर : नाताळ सुटी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी आहे. खासकरून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संगमेश्वर-रामपेठ येथे वाहतूक कोंडी होत आहे. चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

सध्या गणपतीपुळ्याला जाण्यासाठी संगमेश्वर बसस्थानकासमोरील महामार्गावरून गुगल मॅपने संगमेश्वर बाजारपेठेत पर्यटक येतात. त्यांना कोंडअसुर्डे पुलावरून डिंगणी महामार्गावरून जाकादेवीमार्गे गणपतीपुळ्याला जायचे असते. तसेच पारेख पंपाच्या येथून रामपेठमार्गे पर्यटक गणपतीपुळ्याला जातात. बुधवारी (ता. २६) संगमेश्वरमध्ये आठवडा बाजार भरतो. त्यामुळे रामपेठ भागात मोठी
वाहतूक कोंडी होत असून चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करुन ठेवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

पारेख पेट्रोल पंपाजवळ महामार्गावर संगमेश्वर बाजाराकडे जाणारा रस्ता असा बोर्ड लावण्यात आला आहे. तो रामपेठमार्गे बाजारपेठेत जातो. बुधवारी आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत ग्राहकांसह बाहेरून येणारे लहान-मोठे व्यापारी यांची मोठी गर्दी असते. काही बाहेरून येणारे लहान व्यापारी रस्त्यावरच अडथळा निर्माण करतात आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. काही वाहनधारक ज्या ठिकाणी वाहन लावू नये, त्याच ठिकाणी वाहने लावून बिनधास्त खरेदीसाठी बाजारात निघून जातात. कोणाला कसलीच शिस्त राहिलेली नाही. त्यामुळे बाकीच्या लोकांना त्रास होतो. या बेशिस्त पार्किंगला चाप लावणे गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 27/Dec/2024