खेड : कोल्हापूर येथे नुकत्याच शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक पॅरालिम्पिक स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने पॅराऑलिम्पिक्स चॅम्पियनशिप २०२४ या राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडूंच्या अॅथलेटिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यात रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंनी दिव्यांगत्वावर मात करून यश मिळवले. जिल्ह्याचा संघ दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे स्पर्धेत सहभागी झाला होता.
राज्यातून या स्पर्धेसाठी चारशेहून अधिक दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्हा संघात पांडुरंग नाचरे, मंगेश चांदणे, हर्षद चव्हाण, प्रज्ञा जंगम, जनार्दन पवार, सागर आईनकर हे खेळाडू सहभागी झाले होते. जिल्हा संघाचे नेतृत्व करताना खेड तालुक्यातील दयाळ गावची प्रज्ञा जंगम हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून १०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदक, गोळाफेक प्रकारात रौप्य पदक, भालाफेक प्रकारात रौप्यपदक व रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला दिव्यांग धावपटू हा बहुमान पटकाविला व आगामी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली. तसेच खेड तालुक्यातील शिरवली गावाचा हर्षद चव्हाण याने गोळा फेक प्रकारात रौप्य पदक मिळविले. विजेत्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे सल्लागार कौस्तुभ बुटाला, पदाधिकारी पल्लवी सावंत, रेणुका गोरीवले, तुषार पावे, नीलेश रावण, संतोष मालशे, राकेश तांबे यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे व या स्पर्धेत सहभागी झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 28/Dec/2024














