गवत कटाई कामाचे बिल देण्यास नकार; नवोदय विद्यालय प्रशासनावर आरोप

राजापूर : तालुक्यातील पडवे येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाच्या आवारातील गवत कटाईचे काम करूनही संबंधित विद्यालय प्रशासनाकडून अद्यापही बिलांची रक्कम आदा करण्यात आलेली नाही. या विद्यालयाच्या प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरू असून, या विद्यालयांतर्गत जानेवारी ते सप्टेंबर २०२४ पर्यंत झालेल्या कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी देवाचे गोठणे येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक दीक्षित यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय (पडवे) या ठिकाणी विद्यालय प्रशासनाच्या सांगण्यावरून दीड वर्षापूर्वी संपूर्ण विद्यालय आवारातील गवत कटाईचे काम दोन टप्प्यामध्ये आपण करून दिले होते. सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर वारंवार मी बिल मिळण्यासाठी विद्यालयात गेलो होतो. सदर गवत कटाईची बिले मी विद्यालयाला सादर केलेली असून, त्याची पोच माझ्याकडे आहे; मात्र आता विद्यालयाकडे चौकशी केली असता सदर बिलाचा रक्कम आम्ही देणार नाही, अशा प्रकारे उत्तर प्रशासनाकडून दिले जात आहे. तरी या प्रकरणी चौकशी करून सदरच्या बिलाची रक्कम मला अदा करण्याबाबत विद्यालय प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी मागणी दीक्षित यांनी केली आहे. सदर विद्यालय हे केंद्र शासनाचे असून, विद्यालयाकरिता वर्षाला लाखो रुपये अनुदान प्राप्त होते. विद्यालयाची कामे ही दुरुस्ती व देखभाल समिता (विद्यालय पडवे) यांच्यामार्फत झालेली आहे.

कामांच्या पारदर्शकतेबाबत साशंकता
नवोदय विद्यालयाच्या झालेल्या कामच्या पारदर्शकतेबाबत दीक्षित यांनी साशंकता व्यक्त केली आहे. या विद्यालयामध्ये झालेली कामे ही योग्य निविदा न मागवता मर्जीतील ठेकेदाराला परस्पर कामे देण्यात आली असून, झालेल्या कामांचे मूल्यांकन हे कामापेक्षा वाढीव रकमेची बिले काढण्यात आली आहेत. या सर्व कामकाजाची सखोल चौकशी करून संबंधित कमिटीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दीक्षित यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 30/Dec/2024