कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले, अशा घटनांचा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने निषेध केला असून, ७ जानेवारीपर्यंत आरोपींना अटक करण्यासाठी डेडलाइन दिली आहे.
तोपर्यंत राज्य सरकारने जर ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच मुंबईत धरणे धरतील, असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावच्या माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून त्यांना पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन घटनांबरोबरच राज्यात सातत्याने सरपंचांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे सरपंच परिषद आक्रमक झाली आहे.
राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक आहे. सरपंचांनी गाव कसा चालवायचा? सरपंच आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी, असा प्रश्न करीत या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी राज्य सरकारकडे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जी. एम. पाटील (आजरा) यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 30-12-2024