रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप देण्यास आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत दाखल झाले आहेत. नववर्षाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. अपघातांच्या घटना घडू नयेत, यासाठी मद्यप्राशन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी दहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी होमगार्ड, सागरी सुरक्षा दलाला पोलिस यंत्रणेने मदतीला घेतले आहे.
नाताळ आणि थर्टीफर्स्ट साजरा करताना कुणीही दारू पिऊन वाहने चालवू नये आणि नववर्ष स्वागताच्या जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस अलर्ट मोडवर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदीच्या ठिकाणी सर्व वाहनचालकांची ब्रेथ अॅनलायझरच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. कुणी दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे.
नववर्ष स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर पोलिस दलही सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पर्यटकांना काही सूचना केल्या आहेत. एसपी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, थर्टी फस्टच्या दिवशी समुद्रकिनारी कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरिता आम्ही बंदोबस्त तैनात ठेवला आहे. त्यासाठी आम्ही सागर सुरक्षा रक्षक, मच्छिमार आणि स्थानिक ग्रामस्थांची मदत घेणार आहोत.
समुद्रकिनारी जाताना समुद्र खोलीचा अंदाज घ्या, कोणताही आततायीपणा करू नका, अशाच चुकांमुळे समुद्र किनाऱ्यावर दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. दारू पिऊन कुणीही वाहन चालवू नये, दारू पिऊन वाहन चालविल्याने अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे थर्टीफस्ट साजरा करताना दारू पिऊन वाहन चालवू नका, असे आवाहन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.
‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर रहाणार आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी ‘ब्रेथ अॅनलायझर ने वाहन चालकांची तपासणी होणार आहे. दारू पिऊन वाहन चालवताना कुणी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर विशेष लक्ष
रत्नागिरीतील गणपतीपुळे आणि आरेवारे समुद्रकिनाऱ्यावर विशेष लक्ष पोलिस यंत्रणेने दिले आहे. आरेवारे येथे रुग्णवाहिका तैनात करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच गणपतीपुळे रत्नागिरी मार्गावर शिरगाव मोहल्ला येथे वाहतूक कोंडी लक्षात घेऊन दोन बाजूने पोलिस व होमगार्ड बंदोबस्ताला ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दहा ठिकाणी नाकाबंदी
जिल्ह्यात १० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ३५० होमगार्ड, किनाऱ्यावर गाड्या जाऊ नयेत, यासाठी बरकेडिंग, किनाऱ्यावर सागरी सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून धोक्याबाबत अनाऊसिंग करण्यात येत आहे. हर्णे, मुरूड, गणपतीपुळे, आरेवारे येथे वाहतूक पोलिस तैनात, गोवा बनावटीची दारू तपासणी मोहीम जोरात असून पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. सहा ठिकाणी ब्रीथ अॅनालायझरद्वारे मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 31/Dec/2024














