संगमेश्वर : थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली की, घाटमाथ्यावरील मेंढपाळ आपल्या शेकडो मेंढ्यांना घेऊन आपली पावले कोकणकडे वळवतात. या कालावधीत कोकणात या मेंढ्यांसाठीचा चारा जंगलात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो त्यामुळे मेंढ्याचे चांगल्या प्रकारे पालनपोषण उन्हाळा येईपर्यंत करता येत असल्याने मेंढ्याचे संरक्षणही चांगले होते. त्यामुळे हे मेंढपाळ मजल दरमजल करत कोकणातील विविध भागात येत असून, संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी त्यांनी मुक्काम ठोकला आहे.
गरीब मेंढपाळ आपल्या मेंढ्या या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात काही ठराविक दिवस बसवतात. त्या मोबदल्यात मेंढपाळांना तांदूळ अथवा ठरावीक रक्कम दिली जाते. अशाप्रकारे आठवडा, दोन आठवडे एका एका शेतात रात्री या मेंढ्या बसवण्यात येऊन त्या मेंढ्याचे मलमूत्र त्या शेतात पडून शेतीचा कस वाढून शेतीचे उत्पन्न वाढते व खताची मात्रा दिली नाही तरी चालते. अशा प्रकारे मेंढपाळ शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या बसवून पुढे वेगवेगळ्या गावात आपला प्रवास घाटमाथ्यावर पुन्हा जाईपर्यंत करत असतात. हे मेंढपाळ अशा प्रकारे मेंढ्याची व स्वतःची उपजीविका भागवतात. मार्च, एप्रिल, मे मध्ये परतीच्या प्रवासाला लागून आपल्या घरी परतत असतात. सातारा जिल्ह्यातील मेंढपाळ हे कोकणात संगमेश्वर तालुक्यात आपल्या मेंढ्या घेऊन दाखल झाले असून, त्यांचा मुक्काम पुढील दोन-तीन महिने या भागात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 31/Dec/2024














