संगमेश्वर : चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्याची मागणी

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाबद्दल डंपर आणि इतर वाहनांतून भरगच्च माल भरून वाहतूक करणाऱ्या गाड्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी संगमेश्वरमधील ग्रामस्थ व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन कैफियत मांडणार आहेत. गेल्या १५ दिवसांत संगमेश्वर परिसरात चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या डंपरनी सहापेक्षा अधिक गंभीर अपघात केले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रडतखडत सुरू आहे. हे काम करताना अनेक ठिकाणी वाहतूककोंडी आणि रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामे करत असताना अनेक ठिकाणी पुरेशी सुरक्षा नाही. तसेच, चौपदरीकरणाची कामे करणाऱ्या अनेक वाहनांना नंबरच नसल्याचे दिसून येत आहे. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा डंपर समोरून वेगाने येताच पादचारी आणि वाहनचालकांच्या मनात धडकी भरते. अनुभवाची कमी असलेले हे डंपरचालक स्वतःच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे आणि वेगाने चालवत असल्याने गेल्या पंधरा दिवसांत कोळंबे ते तुरळ या दरम्यान सहा गंभीर अपघात घडले. या अपघातात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला तर सहापेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले.

रत्नागिरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाने संगमेश्वर परिसरात चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या सर्व वाहनांची कसून चौकशी करावी, अशी मागणी कोळंबे, कुरचुंडा, ओझरखोल, संगमेश्वर, धामणी, तुरळ येथील ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधीनी केली आहे, अशी माहिती प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी परशुराम पवार यांनी दिली. ठेकेदार कंपनी वाहनांमधून मोठ्या
प्रमाणात विनापरवाना कामगारांची वाहतूक करत आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी माकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या सर्व बेजबाबदारपणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या संदर्भात लवकरच संगमेश्वरमधील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, पोलिस अधीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाला भेटून कैफियत मांडणार असल्याचे परशुराम पवार यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 31/Dec/2024