देवरुख : राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी आयोजित १० वी जयवंत दळवी राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा नुकतीच पार पडली. या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सत्रे-पित्रे महाविद्यालयाची हिरो नंबर वन ही एकांकिका सादर करण्यात आली. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या एकांकिकेतील साक्षी गवंडी हिच्या अलका या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.
हिरो नंबर वन या एकांकिकेचे लेखन सागर माने यांनी केले असून तर दिग्दर्शन सागर माने आणि विक्रांत सामंत यांनी केले आहे. या नाटकामध्ये साक्षी गवंडीसह साहिल खेडस्कर, वैष्णवी साळवी, अफान धामस्कर, तनुजा जठार, केतन कदम, केतकी शेलार, अथर्व पवार, किंजलवेन रैयानी, संकेत जाधव, संग्राम गुरव, रुही गोताड़ या विद्यार्थी कलाकारांचा सहभाग आहे. या एकांकिकेने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन रायसोनी चषक व पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठीही यापूर्वी पात्रता प्राप्त केली आहे. साक्षी गवंडी हिने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त केला होता.
या यशाबद्दल साक्षी गवंडी आणि विद्यार्थी कलाकारांना सर्व मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. नाटकाच्या उत्तम सादरीकरणासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी नाटकाच्या संपूर्ण टीमला रोख १० हजार रुपये विशेष बक्षीस देऊन गौरविले. एकांकिका संपल्यानंतर संस्थाध्यक्ष भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे, प्रा. धनंजय दळवी, प्रा. अक्षय पेठकर, प्रा. सानिका भालेकर, प्रा. चैत्राली कदम यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 31/Dec/2024














