देवरुख-माखजन-नारडुवे एसटी फेरी अचानक बंद केल्याने विद्यार्थी, प्रवाशांचे हाल

संगमेश्वर : देवरुख आगाराची देवरुख-माखजन-नारडुवे चालू असलेली एसटी फेरी गेल्या वीस दिवसांपासून अचानक बंद केल्यामुळे त्याचा फटका शाळेतील विद्यार्थी व प्रवाशांना बसत आहे. बसफेरी चालू न झाल्यास २६ जानेवारीला युवा क्रांती सदस्य विजय शिगवण यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

ही बसफेरी सकाळी देवरुख आगारातून ७ वाजता सुटते व नारडुवे येवून विद्यार्थ्यांना घेऊन ८ वाजून ४५ मिनिटांनी माखजन ससंद हायस्कूलमार्गे आरवली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सोयीचे होत होते. ही बसफेरी अचानक बंद केल्यामुळे नारडुये, पेढांबे, असावे गावातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे.

नारडुवे हा गाव अतिदुर्गम डोंगराळ भाग असल्यामुळे येथील ४० विद्यार्थी हे डोंगर माथ्यावर राहतात. तिथून त्यांना डोंगराच्या पायथ्याशी रस्त्यावर येण्यासाठी एक ते सव्वा तास लागतो. तिथून रस्त्याने ८ किमी सात-आठ वर्षाच्या विद्यार्थ्यांना चालत जावे लागते. माखजन सरंद हायस्कूलपर्यंत नारडुवेतून कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थ्यांना सकाळी ६ वा. घरातून निघावे लागते. शाळेची वेळ ९.३० वा. असताना विद्यार्थ्यांना सहा वाजता निघावे लागते व सायंकाळी घरी पोहोचण्यासाठी साडेसहा वाजतात. जवळजवळ १२ ते १३ तास प्रवास आणि शाळेसाठी जातात. या गाडीने नारडुबे-पेढांबे गावातील ५० ते ५५ विद्यार्थी प्रवास करतात.

गाडी चालू करण्यासाठी देवरुख आगारप्रमुखांशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे देवरुख आगाराच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 01/Jan/2025