रत्नागिरी : कचरा व्यवस्थापनात एक पाऊल पुढे टाकताना निवेदिता प्रतिष्ठानने गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील पहिला एसटी बसस्थानक स्वच्छता प्रकल्प तसेच घरातील सुका कचरा थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात यश मिळवले आहे. या आधी तो डंपिंग ग्राउंडवर पाठवला जात आहे. यासाठी रत्नग्रीन अँग्रो या रत्नागिरीतील कंपनीचे सहकार्य संस्थेला लाभले आहे. रत्नागिरी आणि दापोली या दोन ठिकाणी सुका, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे.
दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठान २००१ पासून कचरा आणि पाणी व्यवस्थापनात काम करते आहे. याबाबत प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे यांनी सांगितले, दोन वर्षांपूर्वी १५ ऑगस्टला दापोली बसस्थानक येथे एसटीत पडलेला कचरा हा डंपिंग ग्राउंडवर न जाता थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात संस्थेला यश आले. तत्कालीन आगारप्रमुख रेश्मा मधाळे यांचे सहकार्य लाभले. कचरा व्यवस्थापनात
मानसिक बदलावर अधिक भर देऊन सोशल मीडिया, व्याख्याने याचा प्रभावी वापर करण्यात आला. कचरा संकलन केंद्र दापोली तालुक्यातील जालगाव येथे गेली आठ वर्षे सुरू आहे. या केंद्रात नागरिक घरातील साठवलेला सुका आणि स्वच्छ कचरा दर शनिवार आणि रविवारी सकाळी स्वतःहून आणून देतात.
घरोघरी जाऊन कचरा संकलन
रत्नागिरी अॅग्रो या कचरा व्यवस्थापनातील कंपनीसमवेत प्रतिष्ठानने घरोघरी जाऊन कचरा संकलनाला सुरुवात केली. जे नागरिक संस्थेकडे त्यांची नोंदणी करतील त्यांच्याकडे महिन्यातून एकदा संस्थेची गाडी ही घरी जाते आणि घरी वेगवेगळ्या गोणीमध्ये वर्गीकरण केलेला आणि बांधून ठेवलेला कचरा संकलित करते. या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, काच सामान, लोखंड, ई-कचरा आता सर्व प्रकारांचा सुका कचरा समाविष्ट असतो. गेल्या दोन वर्षांमध्ये या प्रकारे दहा टन कचऱ्याचे विघटन करण्यात संस्थेला यश आले आहे.
ग्रामपंचायतीही आता सहभागी
घरातील कचरा डम्पिंग ग्राउंडवर किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये जाण्यापासून रोखण्यात यात यश आले. या प्रकल्पात विविध ग्रामपंचायतीही आता सहभाग घेऊ इच्छितात. घरातील कचरा थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे जावा असे वाटत असलेल्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि बहुमजली इमारतींच्या सोसायट्नीयांनी संस्थेशी संपर्क केल्यास संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती प्रशांत परांजपे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 02/Jan/2025














