पावस : अचानक उद्भवणाऱ्या कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि उत्पादनावरही परिणाम होतो. हे लक्षात घेऊन कीड, रोग व्यवस्थापनाच्यादृष्टीने विशेष प्रकल्प कृषी विभागाकडून राबवला जात आहे.
या प्रकल्पांतर्गत पिकावरील कीडरोगांची निरीक्षणे नोंदवली जाणार असून, त्यावर आधारित पीक संरक्षण सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन केंद्र, नवी दिल्ली यांनी विकसित केलेले ई-पेस्ट सर्व्हिलन्स (e pest surveillance) या ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळू शकणार आहे, असे रत्नागिरी उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यातील पोमेडी येथील कृषी चिकित्सालय फळ रोपवाटिका येथे हॉर्टसॅप कार्यशाळा घेण्यात आली. त्या ठिकाणी ते बोलत होते. विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली फलोत्पादन पिकावरील कीडरोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत रत्नागिरी उपविभागामधील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच आंबा व काजू, फळपिक उत्पादक निश्चित प्लॉटधारक शेतकऱ्यांसाठी उपविभागस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
अमोल सपकाळ तंत्र अधिकारी यांनी प्रास्ताविक केले. नारळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी आंबा व काजूपिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत सखोल माहिती दिली. लांजा कृषी विज्ञानकेंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुदेशकुमार चव्हाण यांनी आंबा व काजूपिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड यांनी हॉर्टसॅप अंतर्गत सर्वेक्षण करावयाची पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:48 PM 02/Jan/2025














