◼️ रविवारी चिपळुणात वितरण; मनोरंजनातून प्रबोधनाची दखल
रत्नागिरी : नमन लोककला संस्थेतर्फे दिला जाणारा ‘लोककला विशेष पुरस्कार’ यावर्षी कोकणातील लोकप्रिय पारंपरिक लोककलांचे सादरीकरण असलेल्या ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याला जाहीर झाला असून येत्या रविवारी (ता. ५) सकाळी १० वाजता चिपळूण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
समर्थकृपा प्रॉडक्शन (रत्नागिरी) प्रस्तुत ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याद्वारे कोकणातील नमन, जाकडी, भजन, विविध सणसमारंभ यांचे एकाच धाग्यात गुंफून सादरीकरण केले जाते. पारंपरिक लोककलांच्या सुमधूर संगीताद्वारे कोकणात सर्वाधिक भागात बोलल्या जाणाऱ्या ग्रामीण ढंगाच्या ‘संगमेश्वरी’ भाषेतून विनोदी ढंगाने, लोककलांच्या पारंपरिकतेला कुठेही धक्का न पोहोचवता या लोककला सादर केल्या जातात. कोकणात पावलोपावली भेटणाऱ्या एकापेक्षा एक इरसाल व्यक्तिचित्रांद्वारे प्रहसनांद्वारे कोकणातील निसर्गाची होणारी हानी, ओस पडत चाललेली गावे आदी विविध विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई, गोवा आदी भागात लोकनाट्याचे प्रयोग सादर झाले आहेत. मनोरंजनातून लोकप्रबोधन करत पाचशेव्या प्रयोगाकडे वाटचाल करणाऱ्या या लोकनाट्याची दखल घेत नमन लोककला संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
यावेळी लोककला गौरव, लोककला प्रेरणा आदी पुरस्कारांचेही वितरण होणार आहे. या सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, शेखर निकम, अभिनेता ओंकार भोजने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रसिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रवींद्र मटकर, तसेच महासचिव शाहिद खेरटकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 02-01-2025














