Kolhapur : अंबाबाई मंदिर परिसरात देवीच्या गाण्यांचे स्वर भाविकांच्या कानावर पडणार, ध्वनी यंत्रणा उभारण्याची तयारी

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी प्रत्येकवर्षी लाखो भाविक येत असतात. या भाविकांचे मंदिराच्या परिसरात आगमन होताच मन प्रसन्न व्हावे, त्यांच्या कानावर देवीच्या स्तोत्राचे मंजूळ स्वर पडावेत, दर्शनाचे एक आध्यात्मिक समाधान लाभावे म्हणून नवीन वर्षात मंदिर परिसरात ध्वनी यंत्रणा उभारली जात आहे.

एक महिन्याभरात ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून देवीच्या गाण्यांचे स्वर भाविकांच्या कानावर पडणार आहेत.

देशभरातील अनेक प्रमुख देवस्थानच्या तसेच मंदिरांच्या परिसरात ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून भक्तिगीते, देवीचे स्तोत्र, आरती लावली जात आहे. तिरुपती देवस्थानमार्फत तिरुमला डोंगरावर बालाजीचे गीत ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून लावले जाते. त्यामुळे भाविकांचा थकवा दूर होऊन मन प्रफुल्लित होते. आध्यात्मिक समाधानही लाभत असते. भाविक सर्व संसारिक विवंचना विसरून भक्तिरसात तल्लीन होऊन जातात.

हाच अनुभव आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांना येणार आहे. राज्यभरातून तसेच देशभरातील अनेक राज्यांतून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. कोल्हापूरकरही देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यांना मंदिर परिसरातील दोनशे ते तीनशे मीटर परिघात देवीचे स्तोत्र, आरती, भक्तिगीते भाविकांना ऐकायला मिळणार आहेत.

त्यासाठी ध्वनी यंत्रणेचे १२० खांब उभारण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. याशिवाय १६९ हेेरिटेज पद्धतीचे खांब उभारले जात आहेत. येत्या महिन्यात खांब उभारणे, त्यावर ऐतिहासिक पद्धतीचे बल्ब लावणे, ध्वनी यंत्रणा कार्यान्वित करणे ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सर्व यंत्रणा प्रत्यक्ष कार्यान्विन होईल.

ध्वनीयुक्त खांब उभारणीचे काम मुंबईतील कृष्णा रेफ्रिजरेशन कंपनीला देण्यात आले असून, या कंपनीने अयोध्या येथील राम मंदिर, मधुरा यासह मुंबईत अशा पद्धतीचे काम केले आहे. तर हेरिटेज बल्बचे खांब उभारण्याचे काम पवन क्वीक सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आले आहे. वॉर्मव्हाइट बल्ब या खांबांवर बसविले जाणार असून, त्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्यही खुलणार आहे.

येथे उभारणार ध्वनीयुक्त खांब

बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, मोहन रेस्टॉरंट, जोतिबा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी मंडप, करवीरनगर वाचन मंदिर, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी या परिसरात ध्वनीयुक्त खांब उभारले जात आहेत.

मूळ कल्पना क्षीरसागर यांची

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची ही मूळ कल्पना आहे. त्यासाठी त्यांनी ध्वनीयुक्त खांबांसाठी २ कोटी ६५ लाखांचा, तर हेरिटेज खांबांसाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त करून आणला आहे.

‘देवस्थान समिती’कडे नियंत्रण

हे काम जरी महापालिकेमार्फत केले जात असले तरी त्यावर दैनंदिन देखभाल व नियंत्रण देवस्थान समितीकडे देण्यात येणार आहे. दुरुस्ती असेल तर ते महापालिका पाहणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षासाठी जागा मंदिर परिसरात असेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:53 02-01-2025