रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज कौतुकास्पद : खा. सुनील तटकरे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद आहे. त्याचे सर्व श्रेय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची शिस्त आणि बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी यांनी दिलेली साथ यांचे असल्याचे गौरवोद्गार खा. सुनील तटकरे यांनी काढले.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला खासदार सुनील तटकरे तसेच आ. शेखर निकम, आ. किरण ऊर्फ भैया सामंत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत आ. तटकरे, आ. निकम व आ. सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बँकेचे संचालक रामभाऊ गराटे, महेश खामकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण व बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेने संपूर्ण महाराष्ट्रात एक नावाजलेली जिल्हा बँक म्हणून नाव कमावले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, देशात सहकाराची पडझड होत असताना बँकेचा व्यवसाय टिकवून ठेवणे, ग्राहक टिकवून ठेवणे हे जोखमीचे असताना देखील या परिस्थितीवर मात करुन जिल्हा बँकेने आपल्या ग्राहकांकरिता आधुनिक बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करुन देऊन बँकेची प्रगती साधण्यावर लक्ष केंद्रीत केले. यात जिल्हा बँक पूर्णपणे यशस्वी झाली आहे. म्हणूनच आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये घेतले जाते, असे सांगत तटकरे यांनी लोकांना जास्तीत जास्त व चांगल्या प्रकारे कर्ज स्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केले.