रत्नागिरी : लांजा तालुक्यातील हर्चे, भडे, खानवली, बेनी या ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थ बिबट्याच्या वावराने भयभीत झाले आहेत. बुधवारी हर्चे-तांबेवाडी येथील शेतकऱ्याच्या वासरावर पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून, याबाबत वनविभागाला कळविले आहे.
बुधवारी (ता.१) पहाटे तीनच्या सुमारास हर्चे तांबेवाडी येथील शेतकरी रामचंद्र लक्ष्मण मयेकर यांच्या गोठ्यातील जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये एक वासरू जखमी
झाले आहे. वासराच्या गळ्याजवळच जखम झाली आहे. त्या वासरावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्ते अविनाश मयेकर यांनी वनविभागाला दिली. गेल्या काही दिवसांपासून लांजा तालुक्यातील हर्चे, भडे, खानवली, बेनी या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. काल त्या बिबट्याने हर्चे-तांबेवाडी येथील रामचंद्र मयेकर यांच्या गोठ्यातील वासराला लक्ष्य केले. यानंतर मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.












