लांजा : शहरातील रस्त्यांची दुरावस्था; अपघातांचे प्रमाण वाढले

लांजा, ता. २ : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी जनतेला सर्व्हिस रस्ता करणे आवश्यक होते. मात्र, शहरात आजतागायत सर्व्हिस रस्ता तयार केलेला नाही. दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून ये-जा करणे भाग पडत असून, खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वारांचे घसरून अपघात होत आहेत. एकाच दिवशी तीन दुचाकीस्वार पडून जखमी झाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तातडीने सेवा रस्ता तयार करून द्या, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्याचे काम गेली बरेच वर्ष सुरू आहे. शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुलांच्या पिलरसाठी रस्ता खोदाई केली जात आहे. शहरातील महामार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मातीचे साम्राज्य पसरले आहे. धूळ उडू नये याकरिता संबंधित यंत्रणेकडून पाणी मारले जात असले तरी या पाण्यामुळे आणि रस्त्यावरील मातीमुळे वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. शहरातील नागरिकांसह तालुक्यातील जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल तेव्हा होईल. येथील जनतेला पक्का रस्ता वाहतुकीस तयार करू देण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे. दररोज दूरवस्था झालेल्या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून, जिवावर बेतणारे ठरले असल्याने संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन जनतेची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.