कंत्राटी वैद्यकीय अधिकारी ३ महिने वेतनाविना

गुहागर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गेले ३ महिने वेतनाविना आहेत. शासनाकडून अद्याप अनुदान आलेले नसल्याने जिल्ह्याचा आरोग्य विभाग आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, रखडलेले अनुदान दोन दिवसात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देणारे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी ऑक्टोबर २०२४ पासून वेतनाविना आहेत. शासनाकडून अनुदान रखडल्याने ३ महिने वेतन झालेले नाही. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी इमानेएतबारे सेवा बजावत असतात. ग्रामीण भागात काम करताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. सहसा इतर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात सेवा बजावण्यास तयार होत नाहीत. अशावेळी एमबीबीएस कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदे भरली जातात. मात्र त्यांचेही वेतन वेळेवर होत नाही. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना लसीकरण केंद्रांना भेटी द्याव्या लागतात. त्यांना किमान प्रवासभत्ता तरी मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. त्याकडेही शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.