गृहमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा लांजात निषेध

लांजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंत्रीपदावरू हटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई-ग्रामीण व तालुक्यातील बौद्ध समाज आंदोलन समिती, डॉ. आंबेडकर अनुयायांकडून शुक्रवारी धरणे आंदोलनाने निषेध व्यक्त करत राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली.

या संदर्भात राष्ट्रपती यांना लांजा तहसीलदार यांच्या माध्यमातून निषेधाचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन लांजा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे यांनी स्वीकारले. राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनात लांजा तालुक्यातील बौद्ध समाजाने म्हटले आहे की, लांजा तालुका जिल्हा रत्नागिरी बौद्ध समाज मागासवर्ग व इतर मागासवर्गातील नागरिकांचे वतीने जाहीर निवेदन देण्यात येत आहे की, भारताचे संविधान निर्माता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आम्हाला पुजनीय आहेत. दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी देशाच्या संसद सभागृहात दिलेल्या भाषणात अपमानजन्य वक्तव्य करून देशातील तमाम बौद्ध दलित, मागास इतर मागासवर्गीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा तातडीने दाखल करण्याची मागणी लांजा तालुका बौद्धजन मंडळ, मुंबई ग्रामीण यांनी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे. तहसीलदारांना निवेदन देताना लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुबंई- ग्रामीणचे अध्यक्ष संतोष जाधव, सरचिटणीस सचिन जाधव, उपाध्यक्ष धर्मदास कांबळे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 04/Jan/2025