संगमेश्वर : निर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण महाविद्यालयात १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत वाचन पंधरवडा राबविण्यात येणार असून, विविध साहित्यिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाची उन्नती आणि समाज प्रबोधन होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाची सुरुवात ग्रंथ प्रदर्शनाने करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत वाचन पंधरवडा राबविण्यात येणार असून विविध साहित्यिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजना चव्हाण, मुख्याध्यापक किरण जाधव, प्रा. संतोष खरे, पूजा प्रसादे, प्रशांत जाधव, पृथ्वीराज वाडकर, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. फीत कापून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनाचे महत्त्व व वाचनामुळे होणारे वैयक्तिक लाभ व बदल याबाबत सविस्तर विवेचन केले. तसेच वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथप्रदर्शन आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रंथालय विभागप्रमुख गौरी भोसले यांनी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत पंधरवड्यामध्ये नियमित वाचन उपक्रमासह, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रा. प्रशांत जाधव, ग्रंथपाल गौरी भोसले यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 04/Jan/2025














