चिपळूण : कोकणातील नवीन पिढी एक वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न आज प्रशांत यादव यांच्या माध्यमातून सुरू आहे. आपण येथे आल्यावर वाशिष्ठी मिल्क प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतली आणि आपल्याला अत्यानंद झाला. येथे सुरू असलेले काम योग्य दिशेने चालले आहे. त्यामुळे यादव यांची वाटचाल योग्य पद्धतीने होत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले त्यांच्या हस्ते वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून दुसऱ्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना गटनेते आ. भास्कर जाधव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भाने, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आ. रमेश कदम, वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, सत्यजीत पाटणकर, बतौर मुर्तुझा, जबन कनावजे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, विक्रांत जाधव, राजाभाऊ शेलार, चिपळूण नागरी सह. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, संचालिका स्मिता कव्हाण, नौसीन काझी, लियाकत शाह, मुराद अडरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, आपल्या देशात ६४ टक्क्यांपेक्षा अधिक लोक शेती करतात. त्यामुळे शेती फायद्याची कशी होईल व त्यातून देशाची गरज कशी भागविता येईल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व केंद्रात कृषी मंत्री म्हणून काम केले. दहा वर्षे कृषी मंत्री होतो. ज्यावेळी आपण कृषी मंत्रालयाचा कारभार हाती घेतला, त्यावेळी सचिवांमार्फत पहिलीच फाईल आली. देशात दोन महिने पुरेल एवढाच धान्य साठा आहे. त्यामुळे धान्य आयात करावे लागेल, असा प्रस्ताव आला, त्यावेळी माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. एका बाजूला आपण कृषीप्रधान देश म्हणतो, असे असताना धान्य आम्हाला आयात करावे लागेल. हे संयुक्तिक नव्हते. या बाबत विचार सुरू होता. दुसऱ्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोन आला व तातडीने ही फाईल पुढे पाठवा, असे सांगितले. त्यानंतर आपण सर्व माहिती घेतली आणि नाईलाजाने या प्रस्तावावर सही केली. पण त्यानंतर हे चित्र बदलण्याचे ठरविले. जे करावे लागेल ते करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करणे गरजेचे होते. मात्र, त्यानंतर लक्षात आहे की, देशातील शेतकऱ्यांना थकबाकीचा रोग लागलेला आहे. कर्ज घ्यायचे नाही, घेतले तर परत करायचे नाही, अनेकवेळा सरकार उद्योजकांचे कर्ज माफ करते. मग अशीच योजना शेतकऱ्यांसाठी का आणू नये, असा विचार केला आणि त्यावेळी देशभरातील शेतकऱ्यांचे ७९ हजार कोटींचे कर्ज आपण माफ केले. त्यानंतर शेतकयांना कर्ज मिळू लागले आणि शेतीत भांडवली गुंतवणूक वाढू लागली. या गोष्टीचा फायदा झाला. त्याबरोबर उत्तम दर्जाचे बी-बियाणे, गहू, तांदूळ, डाळी याचे उत्पादन अधिक होईल, असे बियाणे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेच तेच विधाणे बापरून उत्पत्र बाढणार नाही. त्यासाठी संकरित बियाणी हवीत. त्यामुळे परदेशातून बियाणे मागवून पेधील शेतकयांना देण्याचा प्रयत्न केला. या शिवाय नुसती शेती करून चालणार नाही. त्याला जोडधंदा हवा. त्यासाठी पशुधन हे महत्वाचे आहे, या मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या. त्यावेळी महात्मा ज्योतीबा फुले यांनी या मागण्या केल्या होत्या. ते आपण हेरले आणि त्या दृष्टीने विचार केला. मात्र, ज्यावेळी कृषी मंत्रीपद सोडले, त्यावेळी भारत गव्हामध्ये स्वयंपूर्ण झाला होता.
आज आपला देश गव्हामध्ये दोन नंबरचा देश आहे. जगातील अठरा देशांना आज आपला देश धान्य पुरवितो. आज जगात तांदळाचे उत्पादन करणारा आपला देश एक नंबरवर आहे आणि त्याचप्रकारे फळभाजी, फलोत्पादन, दुध या क्षेत्रातदेखील अशाच पद्धतीने प्रगती होत आहे. हे चित्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलले. कृषी क्षेत्रातील संशोधन, नवनवे प्रयोग, मेहनत त्यामुळे हे उत्पादन वाढले, असे शरद पवार यांनी सांगितले.
आज प्रशांत यादव दुधाच्या व्यवसायात क्रांती करीत आहेत. शेतकऱ्यांनी चांगली जनावरे जोपासावी त्यातून उत्पादन वाढवा. त्यातून दुधदुभते वाढेल दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळी उत्पादने तयार करा. त्यामुळे शेतकऱ्याला दुधाची चांगली किंमत मिळेल. हे प्रदर्शन अत्यंत वेगळे आहे. शेतकरी, उत्पादक, महिला बचत गट यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. या पुढच्या काळात मोठ्या जागेत प्रदर्शन भरवा, असे सांगितले.
आ. भास्कर जाधव यांनी प्रशांत यादव यांच्या कार्याचे कौतुक केले. पत्रकार मधुकर भावे यांनीडी मनोगत व्यक्त केले. यानंतर शरद पवार यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्स, आलेले पशुधन याची पाहणी केली, प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. भास्कर जाधव माजी आ. रमेश कदम यांनी दीपप्रज्वलन केले. या निमित्ताने डेरवण रुग्णालयाच्यावतीने रक्तदान शिबीर भरवले होते.
कृषी प्रदर्शनाचा प्रयोग स्तुत्य : जयंत पाटील
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, प्रशांत यादव यांचा कृषी प्रदर्शनाचा प्रयोग स्तुत्य आहे. येथील शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, शेती व्यवसायातील बदल, प्रयोग कळावेत यासाठी हे प्रदर्शन महत्वाचे आहे. आजवर कोकणात पश्चिम महाराष्ट्रातून दूध यायचे. मात्र आज ४५ हजार लीटर दूध वाशिष्ठी डेअरी वितरित करते हा आदर्श महत्वाचा आहे, असे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 06/Jan/2025














