रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे व्यवसायिक प्रदर्शन म्हणून ओळख असणाऱ्या ‘वुमेन्स कार्निव्हल २०२५’ चे आयोजन ९ ते १२ जानेवारी दरम्यान रत्नागिरी येथील जयेश मंगल पार्क येथे करण्यात आलय. या भव्य प्रदर्शानात रत्नागिरीतील उद्योजिका आपल्या व्यवसायाचे प्रदर्शन करीत असतात. याच कार्निव्हलच्या निमित्ताने रत्नागिरी खबरदारच्या वतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाजी विक्रीचा व्यवसाय करून संसार चालविणाऱ्या लक्ष्मी चौगुले यांना ” जीवन संग्राम” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रुपये दहा हजार आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. लक्ष्मी चौगुले या रत्नागिरी शहराच्या गोखले नाका येथे मागील सुमारे २० वर्षापासून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. नवऱ्याने साथ सोडल्यावर देखील त्यांनी अनंत अडचणींचा सामना करीत आपले घर चालवले, मुलांना शिकवले. मिरची, कोथिंबीर विकून स्वतःचे हक्काचे घर देखील त्यांनी रत्नागिरीत घेतले. एका लक्ष्मीने आयुष्यात लक्ष्मी मिळवण्यासाठी केलेली धडपड रत्नागिरी खबरदारने लक्षात घेत या लक्ष्मीला ‘जीवन संग्राम’ पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. या पुरस्काराचे वितरण ९ जानेवारी रोजी जयेश मंगल पार्क येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. शिवाय याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स कार्निव्हल या भव्य व्यवसायिक प्रदर्शनाचा दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्याचा मान देखील लक्ष्मी चौगुले यांना देण्यात येणार आहे.














