पालकांनी स्वतःमध्ये बदल करावेत : प्रा. एहसान सय्यद

राजापूर : मुलांच्या हुशारीची नैसर्गिक वाढ होणे आवश्यक असून या प्रक्रियेत पालकांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांची प्रगती पालक मार्कामध्ये पाहताहेत. हे समाजामधील वास्तव लक्षात घेऊन पालकांनी स्वतः मध्ये आवश्यक ते बदल करणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन मुंबई येथील करिअर मार्गदर्शक प्रा. एहसान सय्यद यांनी राजापूर येथे केले. इमेन्स फाऊंडेशन राजापूरच्या वतीने पालकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सय्यद पुढे म्हणाले, शैक्षणिक गुणवत्ता हे सर्व समस्या सोडविण्याचे साधन नसून, कौशल्याधारित गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा विचार अगोदर पालकांनी आत्मसात केला पाहिजे.

मुलांमध्ये तो हळूहळू रूजू शकेल. यातून मुलांचा आत्मविश्वास वाढीला लागेल आणि कौशल्ये विकसित करून स्वतःच्या भविष्याचे शिल्पकार होण्यासाठी मुले शालेय जीवनापासून तयार होतील.

पालकांनी एक गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की, आपल्या मुलांमध्ये अपयश पचवण्याची क्षमता तयार केली पाहिजे. करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. केवळ एका ठिकाणी संधी मिळाली नाही म्हणून खचून न जाता पालकांनी आपल्या मुलांना मानसिक आधार दिला पाहिजे. ही आजच्या घडीला अत्यावश्यक वाव आहे. पालकांनी ही बाब लक्षात घेत मार्गदर्शन करावे, असेही यावेळी सांगितले.

नगर वाचनालय हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला सुमारे शंभरहून अधिक पालक, शिक्षक आणि संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 30/Sep/2024