मंडणगड : सार्वजनिक वाचनालयांअभावी वाचन संस्कृतीचा ऱ्हास होण्याची चिन्हे..

मंडणगड : तालुक्यात सार्वजनिक वाचनालयांचा अभाव असल्याने सध्या विद्यार्थी व तरुणवर्गाकडून वाचनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र तयार झाले आहे. यामुळे तालुक्यात वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होत असून लोप पावत चाललेली वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची आवश्यकता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी लहान मुलांना जेव्हा शाळांमध्ये सुट्ट्या पडायच्या तेव्हा विविध बालपुस्तके वाचण्यात ते मग्न असायचे. मात्र सध्याच्या युगात वाचन संस्कृती समाजातून हरवताना दिसून येत आहे. अगदी मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत आज प्रत्येकाच्या हातात सध्या स्मार्ट फोन दिसून येतो. इतकेच काय तर वर्तमानपत्रही आजच्या दिवसात सध्या अनेकजण वाचत नसल्याने अपुऱ्या माहितीच्या आधारे आपली भूमिका जाहीर करतात. यामुळे आजच्या दिवसात वाचनसंस्कृती लोप पावताना दिसून येत आहे. टि.व्ही., मोबाईल व सोशल नेटवर्कीग साईट्सच्या अतिरेक वापराने जनमानसाचा वाचनाकडे असलेला ओढा सध्या कमीच असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुळगाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील आजची पिढी वाचाल तर वाचाल हा त्यांचा विचार फारसा अंगीकारताना दिसून येत नसल्याचे दिसते, असे म्हटल्यास गैर ठरु नये. नव्या पिढीचा वाचनाचा ओढा फारच दुर्मिळ झाला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांना विविध विषयांवरील पुस्तकांचा आढावा घ्यावा लागतो. यासाठी लागणारी पुस्तके सहज उपलब्ध होत असतात. तरीही या सोशल मीडियाच्या दुनियेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मोजकीच मुले वाचनालयाची वाट चोखाळताना पहायला मिळत आहेत.

काही वर्षांपूर्वी सुट्टी म्हणजे खेळ, मौज, मजा, मस्ती व मामाच्या गावाला जाणे, कोकणातील गावकडच्या घरी जाणे, मौजमस्ती करणे, पोहणे, सायकल चालवायला शिकणे, दिवसातून तासभर वेळ काढून वाचनालयात जावून कादंबरी, महापुरुषांच्या कथा वाचन करणे आदी कार्यक्रम लहान मुलांचे ठरलेले असायचे. पण काळानुरुप यात बदल झाला. संगणक व मोबाईलचे युग आले. मुले तासनंतास मोबाईलचा वापर करू लागली. आपल्या ज्ञानाचा विस्तार करण्याचे केंद्र म्हणून वाचनालयाची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी दिवसभर येथे युवकांची गर्दी पहायला मिळत असे. आता मात्र या वाचनालयांचे अस्तित्वच धोक्यात आहे. सध्या वाचन संस्कृती टिकवणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे, असे आता वाचकवर्गातून बोलले जात आहे.

वाचनालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर
मंडणगड तालुक्यात सार्वजनिक वाचनालयाचा नक्कीच अभाव आहे. शहरठिकाणी देखील सार्वजनिक वाचनालयाची उपलब्धता नाही. आजपर्यंत या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र बदलत्या कालावधीत तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीच्या गरजा लक्षात घेवून किंबहुना माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तरुणवगनि वाचनाकडे फिरवलेली पाठ व त्यामुळे वाचनसंस्कृती लोप पावत चाललेली असल्याची निरीक्षणे समोर आली आहेत. ही बाब लक्षात घेवून आपण तालुक्यात सार्वजनिक वाचनालयाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला. त्यासाठी वाचनालयाच्या नवीन इमारतीकरीता निधीही मंजूर करून आणला आहे. जागेची निश्चिती झाल्यावर इमारती संदर्भातील कार्यवाही सुरु होईल, असे नगर पंचायतचे गटनेते विनोद जाधव यांनी सांगितले.

नगर पंचायत प्रशासन अपयशी
मध्यंतरीच्या कालावधीत लोकनेते गोपीनाथ मुंडे, महाविद्यालय, मंडणगडचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने नगर पंचायत इमारतीमध्ये सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यात आले होते. मात्र नगर पंचायत प्रशासनाला हे वाचनालय सुरळीत चालवता आले नाही, सद्यस्थितीत ते बंद आहे. शहरात वाचनालय अत्यंत आवश्यक आहे. नगर पंचायतीस शहरवासीयांची ही गरज पूर्ण करता आली नसल्याचे नगरसेवक आदेश मर्चेंडे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 08/Jan/2025