गुहागर नगरपंचायतीच्या माध्यमातून बचत गटांना कायमस्वरूपी स्टॉल मिळावेत : रश्मी पालशेतकर

गुहागर : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिरकणी शहरस्तर गुहागर नगरपंचायत गुहागर संघाचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. शहरातील बचत गटांच्या उत्पादित केलेल्या मालाला मार्केट मिळावे यासाठी गुहागर नगरपंचायतीच्या माध्यमातून कायमस्वरूपी स्टॉल मिळावेत, अशी मागणी संघाच्या अध्यक्षा रश्मी पालशेतकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली.

मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण आणि प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून संघाच्या अध्यक्ष रश्मी पालशेतकर यांच्या हस्ते मान्यवरांना शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. नगरपंचायतचे कर निरीक्षक सचिन जाधव, स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव, इंजिनीयर भूतल,
पुराणिक, खाडे, जनार्दन साटले, प्रीतम वराडकर, असगोलकर, नवजेकर, श्रीम. घाडगे, ओंकार लोखंडे यांचाही सन्मान करण्यात आला. नेहा आरेकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या अध्यक्षा रश्मी पालशेतकर यांनी शहर स्तर संघाच्या कार्यप्रणाली बाबत माहिती दिली. शहरस्तर संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शासकीय योजना, महिला बचत गट यांना उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती, प्रशिक्षण, कर्जपुरवठा, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी केंद्रशासनाच्या कर्जाची माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांना, बचत गटांना उद्योगात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी संपूर्ण गुहागर नगरपंचायत कर्मचारी वृंद, हिरकणी शहर स्तर संघाच्या सचिव स्वाती कचरेकर, वराडकर, अनिता राऊत, दीक्षा माटल, सिद्धी पावसकर, गीतांजली पोमेंडकर आणि सर्व बचत गटांतील सदस्य उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 08/Jan/2025