राजापूर : तालुक्यातील केळवली सिद्धार्थवाडी येथील नळपाणी योजनेच्या विहिरीचे जलजीवन योजनेतून बांधकाम करताना ठेकेदाराने ग्रामस्थांसाठी तात्पुरती पाण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे केळवली सिद्धार्थवाडीतील ग्रामस्थांना विहिरीमध्ये पाणी उपलब्ध असूनही जानेवारी महिन्यामध्ये पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. विहिरीचे बांधकाम हाती घेतले गेल्याने गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असून, त्याबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाच्या जलजीवन योजनेच्या माध्यमातून शासनातर्फे नळाद्वारे ‘हर घर जल’ देण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार गावोगावी लाखो रुपयांच्या नळपाणी योजनांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या या कामांबाबत ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जलजीवन योजनेंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनांची कामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. केळवली सिद्धार्थवाडी येथील ग्रामस्थांना जलजीवन मिशन योजनेच्या कामातील मनमानीपणाचा फटका ग्रामस्थांना बसून गेल्या पंधरा दिवसांपासून येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.
केळवली सिद्धार्थवाडी येथील नळपाणी योजनेचे काम सुरू करताना विहिरीमध्ये पूर्वी असणारे पाण्याचे पंप ठेकेदाराकडून काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, त्या विहिरीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांच्या पाण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना वणवण करावी लागत असल्याची माहिती ग्रामस्थ तांबे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 09/Jan/2025










