रत्नागिरी : चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणूमुळे चिंतेचे कारण नाही. नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. भीतीचे वातावरण निर्माण करू नये, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने केले आहे.
दरम्यान, केंद्राच्या आरोग्य विभागाने तीन जानेवारीला निवेदन प्रसिध्द केले आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झाली नाही. मात्र खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन रत्नागिरीच्या आरोग्य विभागाने केले आहे.
देशातील काही राज्यांमध्ये या विषाणूचे काही रुग्ण सापडले आहेत. मात्र, आपल्याकडे त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार तालुका व जिल्हा पातळीवरील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
हा विषाणू जनुकीयदृष्ट्या अत्यंत स्थिर आहे. त्यामुळे कोविड विषाणूप्रमाणे त्याच्यात जनुकीय बदल होवून नवनवीन व्हेरियंट आढळणे फारसे संभव नाही. या सर्व कारणांमुळे या नेहमी आढळणाऱ्या विषाणूमुळे फार मोठी साथ येण्याची शक्यता अजिबात नाही, नागरिकांनी घाबरून जावू नये, योग्य ती काळजी घ्यावी. – डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. रत्नागिरी
नागरिकांनी हे करू नये
हस्तांदोलन करू नये.
टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये. आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे
सार्वजनिक ठिकाणी धुंकू नये
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये
नागरिकांनी हे करावे
आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे. भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न खावे.
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 10/Jan/2025














