दापोली : हर्णे बंदरातील ‘त्या’ चोरीप्रकरणी संशयिताला पोलिस कोठडी

दापोली : हर्णे बंदर येथे बुधवारी (ता. ८) झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयिताला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. हर्णे येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवा खुर्द येथील धनश्री वाडकर यांच्या मोबाईलसह सुमारे १३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. चोरट्याने पर्यटकांच्या गाडीत खिडकीतून शिरून हा ऐवज लांबवला होता. वाडकर या बुधवारी सकाळी मासे खरेदीसाठी हर्णे बंदरात आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते.

हे सर्वजण पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून तिथे गेले होते. मासे खरेदी करण्यासाठी हर्णे बंदर येथे गाडी उभी करून सर्वजण मासे खरेदीला खाली उतरले होते. त्यावेळी चोरट्याने गाडीच्या खिडकीतून गाडीत प्रवेश करत गाडीत असणारा वाडकर यांचा सुमारे ८ हजारांचा मोबाईल आणि ५,२०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्हीचे मिळालेले फुटेज आणि पेट्रोलिंगच्या वेळेस संशयिताच्या हालचालीवरून साहिम मुस्तफा ऐनरकर (वय २५, रा. मुरूड, दापोली) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे पर्यटकांचे चोरलेले ५ हजार २०० रुपये सापडले. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याने मोबाईलसुद्धा आपल्याकडे असल्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयिताला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती हर्णे दूरक्षेत्राच्या पोलिसांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 10/Jan/2025