चिपळूण : मार्गताम्हाने खुर्द ग्रामसभा प्रकरणाचा अहवाल जिल्हा परिषदेकडे

चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीची २०२३-२४ मध्ये ग्रामसभा झालेली नाही. याविरोधात ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाची पंचायत समितीने चौकशी केली आहे. त्यानुसार ग्रामसभा न घेतल्याप्रकरणी संबंधीत प्रकरणाचा अहवाल जि.प. कडे पाठविला असून, लवकरच याबाबत कारवाई होईल, असे संकेत मिळत आहेत.

तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द येथे २०२३-२४ मध्ये एकही ग्रामसभा झालेली नाही. संबंधीत सरपंचांनी आपली तब्बेत बरोबर नसल्याचे कारण देत रजेवर जाणार असल्याने ग्रामसभा न घेतल्याचे ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या ग्रामसभेत सांगितले होते. सरपंचांनी उपसरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्याची सूचना केली होती. मात्र संबंधीत उपसरपंचानी देखील रजेवर जाणार
असल्याचे कारण देत ग्रामसभा घेण्याचे टाळले होते. ग्रामसभा न झाल्याने विविध विकास कामांना चालना मिळाली नाही. शासनाच्या १५ वा वित्त आयोगाचा निधी पडून आहे. निधी खर्च होण्यासाठी योग्य ते नियोजन केले जात नाही. सबंधीत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी सभा घेतली नाही. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार चिपळूण पंचायत समितीने ग्रामसभा प्रकरणाची चौकशी केली आहे. त्याआधारे जिल्हा परिषदेस अहवाल देण्यात आला. ग्रामसभा न घेतल्याप्रकरणी सरपंचावर करवाईची शक्यता पंचायत समिती प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे. मार्गताम्हाणे खुर्द येथे ग्रामपंचायत सत्ताधारी गट आणि विरोधकांमध्ये सातत्याने काटे की टक्कर सुरू आहे. येथील घरकूल प्रकरण देखील मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

चिवेली ग्रा.पं.चे दप्तर जि.प. कडे
चिवेली येथेही पाणी योजनेत अपहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने तपासणी करत चौकशी देखील केली. गेल्या तीन वर्षापासून चिवेलीत चौकशीच्या फेऱ्या सुरू आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. गटविकास अधिकारी चिवेलीत तपासणीसाठी गेले असता तेथे पाणीपुरवठा समितीचे दातर आढळले नाही. ते दप्तर जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे, हे दप्तर घेतल्याशिवाय त्याची तपासणी करता येत नाही. त्यामुळे सरपंचांनी हे दप्तर ताब्यात घेण्याची सूचना पंचायत समिती प्रशासनाने केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 10/Jan/2025