मार्लेश्वर यात्रौत्सवानिमित्त तहसिलदारांची मार्लेश्वर व्यापाऱ्यांसमवेत बैठक

देवरूख : मार्लेश्वर यात्रौत्सवानिमित्त तहसिलदार अमृता साबळे यांची मार्लेश्वर व्यापाऱ्यांसमवेत बैठक घेतली असून यात्रौत्सव काळात व्यापाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

श्री देव मार्लेश्वराचा यात्रौत्सव दि. ११ जानेवारीपासून सुरु होणार असून हा यात्रौत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. दि. १४ रोजी मार्लेश्वर- गिरीजादेवीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. साक्षात देवांचा लग्नसोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक मार्लेश्वर तीर्थक्षेत्री दाखल होत असतात. मार्लेश्वराचा वार्षिक यात्रौत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या यात्रौत्सवासाठी भाविकांची गर्दी होत असते त्याच अनुषंगाने विशेष खबरदारी घेण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन यात्रौत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीला देवरुख पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय मावळणकर, पो. काँ. अमर घाडी, श्री शिंदे, मंडळ अधिकारी, तलाठी सजा मारळ, आरोग्य विभाग, पोलीस पाटील, सरपंच आणि व्यापारी उपस्थित होते. त्याप्रसंगी श्री मार्लेश्वर देवस्थानतर्फे व ग्रामपंचायत मारळ-निवधे आणि मार्लेश्वर क्षेत्र विकास ट्रस्ट यांचेकडून तहसिलदार श्रीमती अमृता साबळे यांचा शाल व श्रीफळ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान, तहसीलदार यांनी श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे पायथा ते मंदिर परिसराची पाहणी करुन श्री देव मार्लेश्वरचे मनोभावे दर्शन घेतले त्यावेळी पुजारी मंगेश लिंगायत यांचेकडून त्यांच्याहस्ते पुजाअर्चा करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 10-01-2025