नदी वाहती राहिली पाहिजे : प्रा. मनोज बोरगावकर

देवरुख : ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात सध्याचे बेस्ट सेलर लेखक प्रा. मनोज बोरगावकर यांनी ‘नदीष्ट’ या कादंबरीचा प्रवास उलगडून दाखवला.

या कादंबरीद्वारे एका लेखकाने शहरीकरणामुळे, मानवाकडून निसर्गाच्या होणाऱ्या हानीकडे आत्यंतिक तळमळीने लक्ष वेधले आहे. एवढेच नव्हे तर सामान्य माणसांतील असामान्यत्व व जाणीव आपल्या कादंबरीतील अनेक पात्रांतून आस्थेने टिपली आहे. महाविद्यालयात आयोजित केलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘नदी वाहती राहिली पाहिजे तरच मानवी अस्तित्व टिकेल’, असे उद्गार काढले आणि आपला लेखनप्रवास कथन केला. या कार्यक्रमाचे आयोजन आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय आणि सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख यांनी संयुक्तपणे केले होते.

प्रा. बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ ह्या कादंबरीला अल्पावधीतच अमाप लोकप्रियता लाभली. नुकतीच तिची २१वी आवृत्ती प्रसिद्ध झाली, एवढेच नव्हे तर या कादंबरीचे हिंदी, कन्नड, गुजराथी व इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत. नदिष्ट कादंबरीला मानाचे अनेक पुरस्कार मिळाले. चराचरसृष्टीकडे बघण्याची डोळस जाणीव ही कादंबरी वाचकांना देते. महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी प्रा. बोरगावकर यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहलता पुजारी यांनी केले, तर आभार प्रा. अजित जाधव यांनी मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

या कार्यक्रमात सुरवातीला प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी अनुवादित केलेल्या ‘पाश’ या हिंदी कथासंग्रहाचे प्रकाशन लेखक प्रा. मनोज बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, माजी उपाध्यक्ष मदनजी मोडक, श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आदि मान्यवर उपस्थित होते.तसेच देवरुख मधील साहित्य प्रेमी नागरिक, महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. नदिष्ट कादंबरी कला शाखेच्या अभ्यासक्रमात असल्याने विद्यार्थ्यांनीही लेखक प्रा. बोरगावकर यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर, अमृता इंदुलकर, सहाय्यक स्वप्निल कांगणे, रोशन गोरूले आणि नरेंद्र खेडेकर मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 10-01-2025