सावर्डे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानात सावर्डेतील गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
शासनाच्या जिल्हा मुल्याकंन समितीने या अभियानातील खासगी शाळा विभागाचा निकाल जाहीर केला. हे अभियान ४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राज्यात राबवण्यात आले. या अभियानामध्ये विद्यालयाने सहभाग घेतला होता. पायाभूत सोयीसुविधा, शासन ध्येयधोरण अंमलबजावणी, शैक्षणिक संपादणूक या मुद्द्यांची पीपीटी व पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष शाळेची तपासणी झाली. सुविचार, शालोपयोगी चार्टस्, प्रबोधनात्मक चित्रांनी लक्ष वेधून घेणाऱ्या संरक्षक भिंती, विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने केलेली सुंदर वर्ग सजावट आणि आकर्षक शालेय इमारत, कलागुणांनी निपुण आणि बोलके विद्यार्थी या सर्वांचे कौतुक केले. शाळेतील उपक्रम, स्वच्छता मॉनिटर, पीएम विद्या, वर्तमानपत्रांची उपलब्धता व उपक्रमांची प्रसिद्धी, विद्यांजली, महावाचन, नवसाक्षरता, वृक्षसंवर्धन, विद्यालयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले जनजागृतीचे काम या सर्व बाबींची जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने विशेष दखल घेतली. शैक्षणिक दर्जासह अद्ययावत ठेवलेल्या नोंदणीचे विशेष कौतुक करून स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर आदींचे कार्याध्यक्ष शेखर निकम, संचालक शांताराम खानविलकर आदींनी अभिनंदन केले आहे.
जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक), गटशिक्षणाधिकारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, शाळेचा कर्मचारीवर्ग, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच सलग दुसऱ्यांदा शाळेला यश मिळाले. माझ्या दृष्टीने ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. – राजेंद्र वारे, प्राचार्य, निकम माध्यमिक विद्यालय, सावर्डे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 30-09-2024














