रत्नागिरी : २०२३-२४ वर्षात मत्स्योत्पादनात ८१ हजार ८६८ मेट्रिक टनाची घट

चिपळूण : राज्यातील मत्स्योत्पादनात गेल्या २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ वर्षभरात ८१ हजार ८६८ मेट्रिक टनाची मोठी घट दिसून आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा अपवाद वगळता रायगडसह इतर जिल्ह्यांतील मत्स्योत्पादनात घट झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.

गेल्या पाच वर्षातील मत्स्योत्पादनाची आकडेवारी लक्षात घेतली तर यावर्षी सर्वात कमी मत्स्योत्पादन झाले आहे. ही एक चिंतेची बाब आहे. सन २०२२-२३ मध्ये राज्यातील मत्स्योत्पादन ४ लाख ४६ हजार २५६ मेट्रिक टन होते. यात सन २०२३-२४ मध्ये घट होऊन ते ३ लाख ६४ हजार २८८ मेट्रिक टनावर आले. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत मत्स्योत्पादन ८१ हजार मेट्रिक टनाने घटले आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४९ हजार मेट्रिक टन मत्स्योत्पादन झाले. मुंबई उपनगरात ६१ हजार मेट्रिक टन, बृहन्मुंबईमध्ये सर्वाधिक १ लाख ३८ हजार मेट्रिक टन, रायगड जिल्ह्यात २८ हजार मेट्रिक टन, रत्नागिरीत ६९ हजार मेट्रिक टन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ हजार ९७६ मेट्रिक टन मत्स्योत्पादन झाले असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांत कोकण किनारपट्टीला निसर्ग, तौक्ते, क्यार, फयान यासारखी वादळं आली. या वादळांचा मासेमारीला फटका बसला. वादळांच्या काळात समुद्र खवळतो. किनाऱ्यावरील मासे खोल समुद्रात निघून जातात. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात मासे मिळण्याचे प्रमाण कमी होत जाते. वादळ आणि खराब हवामान असेल तेव्हा मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी मज्जाव केला जातो.

मत्स्योत्पादन घटीची कारणे
कोकण किनारपट्टीवर २५ वर्षापूर्वी जेवढे मासे मिळत होते तेवढे मासे आता मिळत नाहीत. गेल्या तीन दशकात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. ज्यातील बहुतांश वसाहतीमध्ये रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. ज्यांचे सांडपाणी प्रक्रिया करून समुद्रात, नदीत आणि खाड्यांमध्ये सोडले गेले.

मत्स्योत्पादन घटण्यामागे प्रामुख्याने नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे आहेत. नैसर्गिक कारणामध्ये हवामानात होणारे बदल, किनारपट्टीवर येणारी वादळे आणि प्रदूषण या घटकांचा समावेश आहे. मानवनिर्मित कारणांमध्ये अनियंत्रित आणि बेसुमार मासेमारी, परप्रांतीय नौकांकडून राज्याच्या सागरी हद्दीत केली जाणारी मासेमारी, एलईडी दिव्यांच्या साह्याने पर्ससीननेटचा वापर करून मासेमारी या कारणांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. – अनिल खडपेकर, मच्छीमार, अंजनवेल, गुहागर

परराज्यांतील मच्छीमारांकडून लूट
राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास निर्बंध घातले जातात. हा काळ माश्यांचा प्रजनन काळ असल्याने या कालावधीत मासेमारी करू नये हा त्यामागचा उद्देश असतो; पण या कालावधीत इतर राज्यात खोल समुद्रातील मासेमारीवर निर्बंध नसतात. त्यामुळे परराज्यातील बोटी राज्याच्या सागरी भागात घुसखोरी करून मासे पकडून घेऊन जातात. ही घुसखोरी रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा अस्तित्वात नाही. याचा गैरफायदा घेऊन अनेक परराज्यातील बोटी सागरी हद्दीत मासे पकडून पसार होतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:55 PM 10/Jan/2025