राजापूर : तालुक्यातील वेत्ये-तिवरे समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवाच्या मादीने अंडी घातली आहे. त्यात सुमारे ३७५ अंड्यांचा समावेश आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली येथील कासवमित्र गोकुळ जाधव यांनी ही अंडी हॅचरीमध्ये सुरक्षित ठेवली आहेत. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातच वेत्ये तिवरे किनारी पहिल्यांदाच कासवाची अंडी सापडली होती तर यंदा कासव विणीच्या हंगामातील पहिले घरटे उशिराने म्हणजे डिसेंबरमध्ये नोंदले गेले आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. वनविभागाच्या नोंदीनुसार, रायगड जिल्ह्यातील ४ तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १४ किनाऱ्यांवर कासवांची वीण होते. तालुक्यातील वाडातिवरे, वेत्ये आणि आंबोळगडचा किनारा सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर ते मे हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो; मात्र यावर्षी काहीसा उशिराने कासव अंडी देण्यासाठी समुद्रकिनारी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातच वेत्ये तिवरे किनारी पहिल्यांदाच कासवाची अंडी सापडली होती तर यंदा कासव विणीच्या हंगामातील पहिले घरटे वेत्ये या ठिकाणी २५ डिसेंबरला सापडले. त्यात कासवाची १३० अंडी सापडली तर सोमवारी (ता. ६) १२० अंडी तर, मंगळवारी (ता. ७) १२५ अंडी याच भागात सापडली आहेत. वेत्ये येथील कासवमित्र गोकुळ जाधव यांना ही अंडी सापडली असून, त्यांनी राजापूरचे वनपाल जयराम बावदाने, वनरक्षक विक्रम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची अंडी हॅचरीमध्ये संरक्षित केली आहेत.
अशी केली जाते सुरक्षा
समुद्राच्या भरतीमुळे व भटकी कुत्री, कोल्हे इत्यादी प्राण्यांमुळे कासवांच्या वाळूतील घरट्यांना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन कासव परतल्यानंतर ही अंडी हॅचरीत सुरक्षित ठेवली जाते. भरती रेषेपासून दूर कासवांच्या घरट्यांचे संरक्षण करण्यासाठी हॅचरी तयार केली आहे. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खड्ड्याप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यात ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. या घरट्यातील अंड्यांमधून सुमारे ४० ते ६० दिवसात कासवांची पिल्ले बाहेर येतात. या पिल्लांना कासवमित्राकडून सुरक्षित समुद्रकिनारी सोडले जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 10-01-2025