गावखडी समुद्रकिनारी कचऱ्याचे ढीग

पावस : पावस-जैतापूर सागरी महामार्गाशेजारी असलेल्या गावखडी समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. या ठिकाणी कासव संवर्धन केंद्र असल्यामुळे साहजिकच पर्यटकांचा ओढा कायम असतो. या ठिकाणी अनेक संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत किनारा स्वच्छतामोहीम हाती घेतली जाते; परंतु ही मोहीम अभियानापुरती मर्यादित राहिल्यामुळे या किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

पावस-जैतापूर सागरी महामार्गाशेजारी गावखडी समुद्रकिनारा आहे. हा किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. याठिकाणी कासव संवर्धन केंद्र असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी भेट देण्यास अधिक पसंती देतात. मात्र, या किनारी सध्या कचऱ्याचे ढीगच ढीग पसरले आहेत. पर्यटक या किनाऱ्यावर फेरफटका मारताना किनारपट्टी भागावर साचलेल्या कचऱ्यामुळे नाराज होतात. त्यामुळे किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. महामार्गाजवळच किनारा असल्याने येथे जाता-येता थांबणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक भागातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचे काम केले जाते; मात्र हे काम अभियानापुरते मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी समुद्रकिनारी स्वच्छता ठेवल्यास पर्यटक आपोआप त्या किनाऱ्याकडे वळू शकतात. त्यादृष्टीने रत्नागिरी तालुक्यातील सागरी मार्गावर असलेल्या गावखडी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता ठेवावी, असे मत या किनाऱ्यावर फेरफटका मारणारे पर्यटक जयराम खाडये यांनी व्यक्त केले.

पर्यटकांची पाठ
कोकणात पर्यटकांची संख्या कशी वाढेल, यासाठी शासनपातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. गावखडी किनारा हा पर्यटकांना आकर्षिक करणारे ठिकाण आहे. मात्र, तेथील अस्वच्छतेमुळे पर्यटक या किनाऱ्याकडे पाठ फिरवू लागले आहेत. ही बाब शासनाने वेळीच लक्षात घेऊन येथील स्वच्छतेकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी भागातील नागरिकांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 11/Jan/2025