संगमेश्वर येथील महामार्गावर बिबट्याचे दर्शन

संगमेश्वर : संगमेश्वर येथे मुंबई-गोवा महामार्गावर चायनीज सेंटरच्या समोर रस्त्याच्या बाजूपट्टीवर रुबाबात बसलेला बिबट्या दानिश पाटणकर यांना दिसला. त्यांनी त्याचा व्हिडिओ करत नागरिकांना सतर्क केले.

गेले काही दिक्स संगमेश्वर शहरासह आजबाजूच्या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने बिबट्याच्या दहशतीने संगमेश्वर शहरासह आजूबाजूचा परिसर प्रत्यक्ष हादरून गेला आहे. मुक्या जनावरांची शिकार करण्यासाठी जंगलभाग सोडून थेट शहरासह मानवीवस्तीत घुसून भटकंती करणाऱ्या बिबट्याची छबी काही ठिकाणच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या, त्या अनेकांच्या मोबाईलपर्यंत पोहोचल्या. व्हिडिओ व छबीसह बातम्यासुद्धा प्रसारित झाल्या. या ठिकाणी बिबट्या दिसला तर उद्या अन्य कोणाला बिबट्याचे दर्शन झाले? कधी त्याचा कुत्रा फस्त तर अन्य कोणाच्या गाईचा फडशा पाडला. यामुळे सध्या भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने खरोखरच संगमेश्वर परिसरात बिबट्याचा वावर आहे का? बिबट्या येतो कोठून? त्याचा मार्ग टिपण्यासाठी चार ते पाच ठिकाणी कॅमेरे लावले. एवढेच नव्हे तर वनविभागाचे काही कर्मचारी संगमेश्वर भागातील वेगवेगळ्या ठिकाणी रात्रभर गस्त घालत आहेत; मात्र त्यांनी लावलेल्या एकाही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला नसल्याचे तसेच गस्तीदरम्यान बिबट्याचा वावर दिसून न आल्याची माहिती वनपाल तौफिक मुल्ला यांनी दिली; मात्र बिबट्याचा वावर आणि मुक्तसंचार आजही कायम असून मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरजवळ दानिश पाटणकर यांना रस्त्याच्या बाजूला बिबट्या बसलेला दिसला.

या बिबट्याची छबी त्यांनी स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रात्रदिवस छोट्या-मोठ्या वाहनांची ये-जा चालूच असते. त्या ठिकाणी बिबट्या आढळल्यामुळे वाहनचालकांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 11/Jan/2025