चिपळूण : अलोरे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

चिपळूण : अलोरे येथील मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय आणि सी. ए. वसंतराव लाड कला, वाणिज्य महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत.

शासनस्तरावरून आलेल्या नवीन उपाययोजनांची अंमलबाजवणी करून इतर शाळांसमोर आदर्श घालून दिला आहे.

परशुराम एज्युकेशन सोसायटीने अलोरे परिसरातील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली शिक्षण घेता यावे यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे दोन सत्रांत शाळा भरते, शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर नजर ठेवतात. शाळेत अनोळखी व्यक्ती आली तर त्याला थेट प्रवेश दिला जात नाही. शाळेच्या प्रवेशद्वारावर रजिस्टर ठेवण्यात आला आहे. त्यात नोंद केल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो. पालक मुलांना घेऊन जाण्यासाठी आले तरी त्यांना नोंद करावी लागते, विद्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ठराविक अंतराने तपासले जाते. अशा फूटेजमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर तातडीने योग्य कार्यवाही केली जाते.

शाळेतील नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने नेमणूक केलेल्या शिक्षकांचे फोटो, त्यांचे नाव सूचनाफलकांवर लावण्यात आले आहेत. नेमणुकीपूर्वी त्यांची चारित्र पडताळणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल स्थानिक पोलिस यंत्रणेला देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजनेचा भाग म्हणून विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच शाळांमध्ये राक्रारपेटी बसवण्यात आली आहे. मुख्याध्यापक, प्रत्येकी एक शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी तक्रारपेटी उघडली जाते. त्यातील तक्रारीचे निराकरण केले जाते. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक महिन्याच्या पहिल्या आठवड्याला होते. त्या बैठकीत तक्रार निवारणाचा अहवाल दिला जातो. दुसऱ्या आठवडयात परशुराम एज्युकेशन संस्थेची बैठक होते. त्यातही महिन्याचा कार्य अहवाल सादर केला जातो.

शालेयस्तरावर आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करत चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेतो आणि त्यावर मार्ग काढतो. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेतली जाते. सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे पालन केले जाते. विद्यार्थी सुरक्षा समितीचा वेळोवेळी आढावा घेतला जातो- विभाकर वाचासिद्ध, मुख्याध्यापक, अलोरे विद्यालय

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 11/Jan/2025