खेड : आंबवलीतील लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे दहा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार

खेड : तालुक्यातील आंबवली येथील लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे पंचक्रोशीतील दहा गावांचा कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, सुमारे एक हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. मातीच्या या धरणात १५५० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा होणार आहे.

गेली अनेक वर्षे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंबवलीत धरण व्हावे, अशी मागणी केली होती. प्रत्येक वेळी उन्हाळ्यात आंबवलीसह जवळच्या गावांना पाणीटंचाई भेडसावत होती.

प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात या गावातील वाड्यावाड्यांमधून खेड पंचायत समिती विभागामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. ही गरज ओळखून लघुपाटबंधारे विभागामार्फत १९९६ पासून धरणासाठी प्रयत्न सुरू होते. दोन वर्षांपूर्वी आमदार योगेश कदम यांनी आंबवली येथील जाहीर कार्यक्रमात धरण बांधण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. या धरणासाठी अंदाजे ४४ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर ११ फेब्रुवारी २०२४ ला आंबवली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे भूमीपूजन झाले.

या प्रकल्पामुळे आंबवली पंचक्रोशीतील दहा गावांचा कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मातीच्या धरणामुळे २.५९ चौ. किमी क्षेत्र पाणलोटाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे आंबवली परिसरातील वरवली, देवघर, हुंबरी, म्हाळुंगे, मोहाने यांसह दहा गावांना कृषी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही. आजुबाजूच्या गावातील शेतजमीन ओलिताखाली येणार असल्यामुळे स्थानिक स्तरावर शेतीतून रोजगार निर्मिती आणि फळबाग लागवडीला चालना मिळू शकते.

आंबवली लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी ४३ कोटी ९८ लाख ५३ हजार १४८ रुपयांचा निधी मिळाला आहे. या धरण क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना शासनाकडून मोबदला मिळवून दिला जाईल. या धरणातील पाण्याचा उपयोग ग्रामीण भागातील युवकांनी शेती व पूरक व्यवसायासाठी करावा, तसे झाले तर अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. – योगेश कदम, राज्यमंत्री

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 11/Jan/2025