देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील ग्रामस्थांचा सरपंच यांनी पदाचा गैरवापर करून राजकीय सूडबुद्धीने कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता चोवारवाडीचा पाणी पुरवठा बंद केला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी व पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा १५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या बाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी व गटविकास अधिकारी, संगमेश्वर यांना निवेदन दिले आहे. यात सरपंच सहदेव सुवरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत राजकीय सूडबुद्धीने गावचा व १०० पट संख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद केल्यामुळे लाभार्थ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचे देखील हाल होत आहेत.
माहे मार्च २०२५ पर्यंतची पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायत दप्तरी भरणा केलेली असतानाही सरपंचांनी पदाचा गैरवापर करून राजकीय सूडबुद्धीने कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेचा पाणीपुरवठा बंद केला. या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ प्रमाणे संबंधित सरपंच यांच्यावर आपत्रातेची कारवाई करून त्यांना पदावरून हटवण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 13/Jan/2025














