रत्नागिरी : लोकमान्य टिळक स्मारक आता सातही दिवस खुले राहणार

रत्नागिरी : शहरातील टिळक आळीत लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय स्मारक आहे. सुशोभीकरणानंतरही दर सोमवारी साप्ताहिक सुटी घेऊन ते बंद ठेवण्यात येत होते. त्यामुळे स्मारकाला भेटी देण्यासाठी येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांचा हिरमोड होऊन स्मारक भेटीची संधी हुकल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात होती. अखेर ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांनी ९ जानेवारीला राज्याचे उद्योग आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर सामंत यांनी तत्काळ पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून हे स्मारक यापुढे कोणतीही सुटी न घेता वर्षाचे बारा महिने पर्यटकांसाठी खुले ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

लोकमान्य टिळक स्मारकाचे सुशोभीकरणासाठी सामंत यांनी कोट्यवधींचा निधी दिला आहे. त्यातून या स्मारकाला मूळ रूपात; परंतु नव्या ढंगात विकसित करण्यात आले आहे. हे स्मारक पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात. तसेच शाळेची मुलंदेखील सहलीचे आयोजन करून स्मारक पाहण्यासाठी येतात; मात्र पुरातत्त्व खात्याला राष्ट्रीय स्मारकापुढे साप्ताहिक सुटी महत्त्वाची वाटत होती. यापूर्वीही दर रविवारी हे स्मारक बंद ठेवण्यात येत असे. याप्रकरणी साप्ताहिक सुटी रविवारऐवजी सोमवारी सेकन स्मारक बंद ठेवण्याचा प्रघात पडला होता; परंतु मंत्री सामंत यांनी वाढत्या तक्रारी आणि पर्यटकांचा होणारा हिरमोड लक्षात घेऊन लोकमान्य टिळक स्मारक आठवड्यातील सातही दिवस खुले ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 13/Jan/2025